अहमदाबाद: आम आदमी पक्षाचेचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी गुजरातमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत दावा केलाय की, राज्यात त्यांच्याच पक्षाचे सरकार येणार आहे. नुसता दावा केला नाही, तर त्यांनी पत्रकार परिषदेत कागदावर लिहून दिले.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, 27 वर्षे सत्तेत असलेल्या भाजपला यंदा मोठा झटका बसणार आहे. रस्त्यावर कुणालाही विचारा, तो म्हणले आपला मतदान करणार. यामुळेच भाजपमध्ये घबराट पसरली आहे. गुजरात हे पहिले राज्य आहे, जिथे सामान्य माणूस मतदानाबाबत बोलायला घाबरतोय. त्याला भाजपचे लोक मारतील असे वाटते, असे केजरीवाल म्हणाले. तसेच, गुजरातमध्ये आपच्या 92+ जागा येतील, असंही ते म्हणाले.
तसेच, गुजरातमध्ये काँग्रेसचा मतदार शोधूनही सापडत नाही, असा दावा केजरीवाल यांनी केला. यावेळी भाजपची मोठी व्होट बँक 'आप'ला मत देईल. माझे राजकीय भाकीत खरे ठरणार, असेही केजरीवाल म्हणाले. हा दावा करताना केजरीवाल यांनी भर पत्रकार परिषदेत कागदावर लिहून दिले. विशेष म्हणजे, पंजाब निवडणुकीदरम्यानही त्यांनी अशाच प्रकारचा दावा केला होता आणि तिथे त्यांचे सरकार आले.
जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन यावेळी अरविंद केजरीवाल म्हणाले की, मी गुजरातमधील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना आश्वासन देऊ इच्छितो की, आमचे सरकार स्थापन झाल्यास 31 जानेवारीपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अधिसूचना जारी केली जाईल. मी हवेत बोलत नाही, आम्ही पंजाबमध्ये ओपीएस लागू केला आहे. मसाज पार्लरबाबत भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या वक्तव्यावर केजरीवाल म्हणाले की, भाजप दिल्लीत व्हिडिओ शॉप उघडणार आहे, भाजप ही व्हिडिओ बनवणारी कंपनी बनली आहे, असा टोला त्यांनी लगावला.