Gujarat Election 2022: “आदिवासींचा विकास करण्यास भाजपच सक्षम”; टीका करत काँग्रेस नेत्याचा पक्षाला रामराम

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 10:41 AM2022-05-03T10:41:58+5:302022-05-03T10:44:26+5:30

Gujarat Election 2022: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीमुळे प्रभावित असून, केवळ विचारधारेमुळे काँग्रेसमध्ये होतो, असे या नेत्याने म्हटले आहे.

gujarat election 2022 congress khedbrahma mla ashwin kotwal left party to join bjp | Gujarat Election 2022: “आदिवासींचा विकास करण्यास भाजपच सक्षम”; टीका करत काँग्रेस नेत्याचा पक्षाला रामराम

Gujarat Election 2022: “आदिवासींचा विकास करण्यास भाजपच सक्षम”; टीका करत काँग्रेस नेत्याचा पक्षाला रामराम

Next

गांधीनगर: आताच्या घडीला देशातील वातावरण अनेकविध कारणांवरून तापताना पाहायला मिळत आहे. अशातच गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी (Gujarat Election 2022) सर्व राजकीय पक्षांनी हळूहळू मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. पाच राज्यांतील दारुण पराभवानंतरही काँग्रेसला एकावर एक धक्के बसत आहेत. हार्दिक पटेल यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतलेला असतानाच काँग्रेसच्या एका बड्या नेत्यांना पक्षाला सोडचिठ्ठी दिली असून, भाजपमधील प्रवेश निश्चित झाला आहे. यावर प्रतिक्रिया देताना आदिवासी समाजाचा विकास करण्यास केवळ भाजप सक्षम असल्याचे या नेत्याने म्हटले आहे. 
 
काँग्रेसमधील एक मोठे नाव आणि दमदार नेते म्हणून ओळख असलेल्या अश्विन कोतवाल यांनी पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करण्याचे निश्चित केले आहे. आदिवासी समाजावर अश्विन कोतवाल यांची मजबूत पकड असल्याचे बोलले जाते. खेडब्रह्मा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले होते. अश्विन कोतवाल यांच्या भाजप प्रवेशामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. विधानसभेत विरोधी पक्षनेते पद न मिळाल्यामुळे अश्विन कोतवाल काँग्रेसवर नाराज होते. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मोठा प्रभाव

सन २००७ पासून काँग्रेस आमदार म्हणून काम करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते, तेव्हापासून त्यांचे काम, त्यांची कार्यशैली मी जवळून पाहिली आहे. नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असल्यापासूनच माझ्यावर त्यांचा मोठा प्रभाव आहे. मात्र, केवळ विचारधारेमुळे मी काँग्रेसमध्ये आजपर्यंत राहिलो. मला माझ्या कार्यक्षेत्रातील आदिवासी समूहाचा विकास करायचा आहे. त्यांच्यासाठी चांगले काम करायचे आहे. आदिवासी समाजाचा विकास करण्यास केवळ भाजपच सक्षम आहे आणि म्हणूनच काँग्रेस सोडून भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे अश्विन कोतवाल यांनी सांगितले. 

दरम्यान, पाटिदार आंदोलनामुळे चर्चेत आलेले हार्दिक पटेलकाँग्रेसला रामराम करण्याची शक्यता आहे. हार्दिक पटेल पक्षावर नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. हार्दिक पटेल गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष आहेत. मात्र आता त्यांनी त्यांच्या ट्विटर बायोमधून काँग्रेसचा उल्लेख काढला आहे. आता त्यांच्या बायोमध्ये 'देशभक्त, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ता,' असा उल्लेख आहे. त्यामुळे हार्दिक पटेल लवकरच काँग्रेस सोडतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
 

Web Title: gujarat election 2022 congress khedbrahma mla ashwin kotwal left party to join bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.