गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार आता अखेरच्या टप्प्यात आला आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील खेडा येथे जनतेला संबोधित केलं. यावेळी देशात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांवरून त्यांनी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न केला. “गुजरात आणि देशात काँग्रेस आणि समविचारी पक्षांपासून सावध राहण्याची गरज आहे, जे आपली व्होट बँक सुरक्षित ठेवण्यासाठी मोठ्या दहशतवादी हल्ल्यांवरही शांत राहतात,” असं मोदी यावेळी म्हणाले. काँग्रेस आणि त्यांचे समविचारी अनेक पक्ष यश मिळवण्यासाठी दहशतवादाला शॉर्टकट समजत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
“दहशतवाद आता संपला नाही आणि काँग्रेसचं राजकारणही बदललं नाही. काँग्रेस दहशतवादाला व्होट बँकेच्या चष्म्यातून पाहते. ना केवळ काँग्रेस, शिवाय त्यांचे समविचारी पक्ष हे दहशतवादाला यशाच्या शॉर्टकटच्या रुपात पाहतात आणि छोट्या पक्षांची सत्तेची भूक आणखी मोठी आहे,” असं मोदी यावेळी म्हणाले. परंतु त्यांनी कोणत्याही पक्षाचं नाव या ठिकाणी घेतलं नाही.
जेव्हा मोठे दहशतवादी हल्ले होतात तेव्हा या पक्षांचं तोंड बंद असतं, जेणेकरून त्यांची व्होटबँक नाराज होऊ नये. दहशतवाद्यांना वाचवण्यासाठी ते मागच्या दाराने न्यायालयातही जात असल्याचे ते त्यांनी नमूद केले. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान १ डिसेंबर रोजी आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होणार आहे.
"दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ काँग्रेस नेता रडला"“जेव्हा बटला हाऊस एन्काऊंटर झालं तेव्हा काँग्रेसचा एक नेता दहशतवाद्यांच्या समर्थनार्थ रडू लागला होता. गुजरात आणि देशानं अशा पक्षांपासून सतर्क राहिलं पाहिजे. २०१४ मध्ये तुमच्या एका मतानं दहशतवादाविरोधातली लढाई अधिक मजबूत केली. आता तुमच्या शहरांमध्ये दहशतवादी हल्ले विसरून जा. आता सीमेवरही असे हल्ले करण्यापूर्वी आपले शत्रू १०० वेळा विचार करतात,” असे मोदी म्हणाले.