Arvind Kejriwal Gujarat Visit: दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्यावरील कारवाईमुळे आप आणि भाजप आमनेसामने आले आहेत. दरम्यान, गुजरातमध्ये निवडणूक प्रचारासाठी आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी मनीष सिसोदिया यांच्यावरील सीबीआयच्या कारवाईची निंदा केली आणि मनीष सिसोदिया यांना भारतरत्न मिळायला हवा, असे म्हटले.
'सिसोदियांना भारतरत्न द्या'अरविंद केजरीवाल म्हणाले की, 'मनीष सिसोदिया जगातील सर्वोत्तम शिक्षण मंत्री आहेत. न्यूयॉर्क टाईम्सनेही ते जगातील सर्वोत्तम शिक्षण मंत्री असल्याचे मान्य केले आहे. मनीष सिसोदिया यांनी सरकारी शाळांमध्ये अनेक चांगल्या सुधारणा केल्या. इतर पक्षांना गेल्या 75 वर्षांत करता आल्या नाही. अशा व्यक्तीला भारतरत्न मिळायला हवा, संपूर्ण देशाची शिक्षण व्यवस्था त्यांच्या ताब्यात द्यायला हवी. पण, उलट अशा व्यक्तीवर सीबीआयने छापे टाकले आहेत,' असे केजरीवाल म्हणाले.
'भाजपसरकारमध्ये प्रचंड अहंकार'ते पुढे म्हणाले की, 'गेल्या 27 वर्षापासून राज्यात सत्ता असलेल्या भाजप सरकारमध्ये प्रचंड अहंकार भरला आहे. गुजरातची जनता या सरकारमुळे दुःखी आहे. पण, आम्ही सकारात्मक वातावरण तयार करू, विविध वर्गांसाठी उत्तमोत्तम योजना आणू. आजही आम्ही शिक्षण आणि आरोग्याची हमी देणार आहोत. गुजरातच्या सरकारी दवाखान्याची अवस्था अत्यंत वाईट आहे, यामुळे नागरिकांना खासगी रुग्णालयात जावे लागत आहे. आम्ही गुजरातमध्ये दिल्ली मॉडेल राबवू.'
'राज्यभर मोफत उपचार देऊ''गुजरातमध्ये आपचे सरकार आल्यावर लोकांना मोफत उपचार देऊ, औषधे देऊ. जागोजागी मोहल्ला दवाखाने उघडू, सरकारी रुग्णालये आलिशान बनवू, नवीन रुग्णालयेही बांधू. दिल्लीप्रमाणेच गुजरातमध्ये अपघात झाल्यास कोणालाही मोफत उपचार दिले जातील. मग ते सरकारी रुग्णालय असो वा खाजगी रुग्णालय. या योजनेद्वारे आम्ही दिल्लीतील 13 हजार लोकांचे प्राण वाचवले आहेत,' अशी स्तुतीसुमने केजरीवालांनी गायली.