Gujarat Election 2022: आश्वासनांची खैरात! काॅंग्रेसच्या जाहीरनाम्यात ५०० रुपयांत सिलिंडर, आता भाजप आणि आपकडे लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2022 08:56 AM2022-11-13T08:56:35+5:302022-11-13T08:56:58+5:30
Gujarat Election 2022: गुजरात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला.
अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. काँग्रेसने निवडणुकीसाठी आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. सरकारी आणि निमसरकारी विभागांत दहा लाख नोकऱ्या, ५०० रुपयांत एलपीजी सिलिंडर, दरमहा ३०० युनिट मोफत वीज, बेरोजगारांना दरमहा ३,००० रुपये भत्ता, तसेच दिव्यांग, विधवा, ज्येष्ठ नागरिक व गरजू महिलांना २,००० रुपये पेन्शन देण्याचे आश्वासन दिले आहे.
दोन दशकांहून अधिक काळ राज्यात सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यात मतदारांना आकर्षित करण्यासाठी अनेक आश्वासने दिली आहेत. मच्छीमारांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ, केजी ते पीजी (बालवाडी ते पदव्युत्तर) मोफत शिक्षण देण्याचेही आश्वासन जाहीरनाम्यात दिले आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी हा जाहीरनामा प्रसिद्ध केला. गेहलोत हे गुजरात निवडणुकीसाठी पक्षाचे वरिष्ठ निरीक्षक आहेत. सत्ताधारी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध हाेण्यास पाच ते सहा दिवस लागू शकतात.
भाजपच्या दुसऱ्या यादीत माजी मंत्र्यांचे तिकीट कापले
भाजपने गुजरातमध्ये आणखी सहा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. माजी मंत्री विभावरीबेन दवे यांच्याऐवजी सेजल पांड्या यांना उमेदवारी दिली आहे. धोराजी येथून माजी कुलगुरू महेंद्र पडालिया यांना तिकीट दिले आहे.
नरोडा पाटिया प्रकरणातील दोषीच्या मुलीला उमेदवारी
भाजपने २००२ च्या गोध्रा प्रकरणानंतरच्या नरोडा पाटिया दंगलीतील दोषी मनोज कुक्राणीची मुलगी पायल कुक्राणी (वय ३०) यांना अहमदाबादच्या नरोडा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे.