अहमदाबाद - डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला गुजरातमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. आता काँग्रेसचे नेते राहुल गांधीही भारत जोडो यात्रेमधून वेळ काढत गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पोहोचले आहेत. दरम्यान, सोमवारी राहुल गांधी गुजरातमधील एका प्रचारसभेत भाषण देत असताना त्यांना एका व्यक्तीने अचानक रोखले. त्यामुळे सारेच अवाक झाले. त्याचे झाले असे की, राहुल गांधी हिंदीमध्ये भाषण देत होते. तर त्या भाषणाचा गुजराती अनुवाद भरतसिंह सोलंकी करत होते. त्यावेळी या व्यक्तीने भाषण थांबवून राहुल गांधी यांना हिंदीतूनच भाषण सुरू ठेवण्याचा आग्रह धरला. तसेच आम्ही समजून घेऊ गुजराती अनुवादाची गरज नाही, असे सांगितले.
राहुल गांधी भाषण करत असताना ही व्यक्ती उभी राहिली आणि म्हणाली. तुम्ही हिंदीतच बोला. आम्ही समजून घेऊ, आम्हाला अनुवादकाची गरज नाही. त्यानंतर राहुल गांधी थांबले आणि त्यांनी मंचावरील नेत्यांना विचारले की हे योग्य ठरेल का. तेव्हा उपस्थित जनतेनेही त्यांना पाठिंबा दिला आणि भाषणामध्ये अनुवादकाची गरज उरली नाही.
सध्या भारत जोडो यात्रेवर निघालेल्या राहुल गांधी यांची गुजरात निवडणुकीतील ही पहिलीच सभा होती. ते सुरत जिल्ह्यातील महुवा येथे उपस्थितांना संबोधित करत होते. यावेळी त्यांनी आदिवासी हे देशाचे पहिले मालक असल्याचे सांगत भाजपा त्यांचे हक्क हिरावून घेत असल्याचा आरोप केला. भाजपावाले आदिवासींना वनवासी म्हणतात. तुम्ही भारताचे पहिले मालक आहात हे सांगत नाहीत. तुम्ही शहरात राहावं असं त्यांना वाटत नाही. तुमची मुलं शिकून डॉक्टर, इंजिनियर बनावतीत, इंग्रजी शिकावीत असं भाजपाला वाटत नाही.
यावेळी आर्थिक धोरणांवरूनही राहुल गांधी यांनी भाजपावर टीका केली. ते म्हणाले की, सध्याच्या सरकारने देशामध्ये दोन राष्ट्रे तयार केली आहेत. एकीकडे अतिश्रीमंत लोक आहेत. ते काहीही स्वप्नं पाहू शकतात आणि ती पूर्ण करू शकतात. बंदरांपासून विमानतळांपर्यंत खरेदी करू शकतात. दुसरीकडे देशात गरीब आणि मध्यमवर्ग आहे. त्याला प्रत्येक गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. जे गरिबीतून बाहेर पडले आहेत. त्यांना पुन्हा गरिबीच्या गर्तेत ढकलण्यात आले आहे.