Gujarat Election 2022: गुजरात भाजपमध्ये पसरले बंडखोरीचे लोण, अनेक नेत्यांची अपक्ष लढण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2022 06:58 AM2022-11-14T06:58:07+5:302022-11-14T06:58:41+5:30
Gujarat Assembly Election 2022: आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तिकीट नाकारल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या किमान एक विद्यमान आमदार आणि चार माजी आमदारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची धमकी दिली आहे.
अहमदाबाद : आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने तिकीट नाकारल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या किमान एक विद्यमान आमदार आणि चार माजी आमदारांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची धमकी दिली आहे.
भाजपचे माजी आमदार हर्षद वसावा यांनी शुक्रवारीच अनुसूचित जमातीच्या उमेदवारांसाठी राखीव असलेल्या नांदोड जागेवरून अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. वडोदरा जिल्ह्यात तिकीट नाकारण्यात आल्यानंतर एक विद्यमान आणि भाजपचे दोन माजी आमदार पक्षाच्या विरोधात उभे आहेत. वाघोडियाचे सहा वेळा आमदार मधु श्रीवास्तव, वडोदरा जिल्ह्यातील पदरा मतदारसंघातील भाजपचे आणखी एक माजी आमदार दिनेश पटेल उर्फ दिनू मामा यांनीही स्वतंत्रपणे निवडणूक लढविणार असल्याचे सांगितले आहे.
काँग्रेसची नऊ उमेदवारांची यादी जाहीर
गुजरात विधानसभेसाठी काँग्रेसने नऊ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. द्वारका विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसने मलुभाई कंडोरिया यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने आतापर्यंत १०४ उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.
आप उमेदवाराने उमेदवारी अर्जासाठी जमविला निधी
गुजरातमधील वडोदरा येथील सयाजीगंज येथील आम आदमी पक्षाच्या उमेदवार स्वजल व्यास यांनी सुरक्षा ठेव भरण्यासाठी त्यांच्या समर्थकांकडून निधी गोळा केला. सोशल मीडियावर त्यांनी केलेल्या आवाहनावर दोन तासांत नऊ हजार रुपये जमा झाले.