अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्याचं मतदान उद्या १ डिसेंबर रोजी होणार आहे. या निवडणुकीमध्ये भाजपा आणि काँग्रेससोबतच अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्षही पूर्ण ताकदीनिशी उतरला आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक अधिक चुरशीची होण्याची शक्यता आहे. दरम्यान, आपने गुजरातमध्ये भाजपाचं टेन्शन वाढवल्याची चर्चा होत असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी आपबाबत मोठं विधान केलं आहे. गुजरातमध्ये भाजपासमोर आपचं कुठलंही आव्हान नसून या निवडणुकीत आम आदमी पक्षाचं खातंही उघडणार नाही, असा दावा अमित शाह यांनी केला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर ८ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. दरम्यान, अमित शाह यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता, राज्याचे मुख्यमंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम, त्यांच्या कार्यकाळात झालेला गुजरातचा विकास आणि लांगुलचालनाविरोधातील धोरण यामुळे गेल्या २७ वर्षांपासून मतदारांनी भाजपाला वारंवार विजयी केले आहे. यावेळीही भाजपा गुजरातमध्ये अभूतपूर्व विजय मिळवेल. लोकांना आमचा पक्ष आणि आमचे नेते नरेंद्र मोदी यांच्यावर पूर्णपणे विश्वास आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.
यावेळी गुजरातमध्ये आम आदमी पक्षाने उभ्या केलेल्या आव्हानाबाबत विचारले असता अमित शाह म्हणाले की, प्रत्येक पक्षाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे. मात्र त्या पक्षाला स्वीकारायचे की नाही याचा निर्णय मतदारांवर अवलंबून असतो. गुजरातमधील लोकांच्या मनात आप कुठेही नाही आहे. कदाचित आपच्या उमेदवारांची नावं निवडणुकीत विजयी झालेल्या उमेदवारांच्या यादीमध्ये दिसणारही नाहीत, असा दावा अमित शाह यांनी केला.
गुजरातमध्ये काँग्रेस आणि भाजपा हे मुख्य पक्ष आहेत. तसेच गेल्या काही विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि आपमध्येच मुख्य लढत झालेली आहे. मात्र यावेळी आप मैदानात उतरल्याने चुरस वाढली आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल जोरदार प्रचार करत आहेत. मात्र सध्यातरी गुजरातमध्ये काँग्रेस हाच भाजपाचा मुख्य विरोधी पक्ष आहे, असे अमित शाह यांनी म्हटले आहेत.