गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान गुरुवारी पार पडले. परंतू, मतदारांमध्ये उत्साह दिसून आला नाही. यामुळे सत्ताधारी भाजपाच्या गोटात कमालीची अस्वस्थता निर्माण झाली आहे. २०१७ च्या निवडणुकीपेक्षा पाच टक्क्यांनी मतदानाची टक्केवारी घटली आहे. यामुळे आपच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. अरविंद केजरीवाल यांनी आपला पूर्ण फोकस सुरतच्या आजुबाजुच्या जागांवर वळविला होता. कारण नगरपालिकांच्या निवडणुकीत आपने पहिल्यांदाच विजय मिळविला होता. यामुळे आपने या भागात आपले जाळे विणण्यास सुरुवात केली होती.
गुजरातमध्ये सुरत हे मोठे शहर आहे. आपने भाजपाच्या किल्ल्यात सुरुंग लावण्याची तयारी केली आहे. यामुळे भाजपाला सुरतमधील जागा वाचविणे आव्हान ठरले आहे. सुरतच्या १६ पैकी १५ जागांवर गेल्यावेळी भाजपाचे आमदार जिंकले होते. २०१७ मध्ये या भागात 66.65 टक्के मतदान झाले होते. परंतू यावेळी 61.71 टक्के मतदान झाले आहे. हे पाच टक्के भाजपाबरोबरच काँग्रेसलाही टेन्शनमध्ये टाकत आहेत.
सुरतच्या वराछा, कतारगाम, कामरेज, सूरत उत्तर, करंज या जागांवर भाजपाला आपची किंवा काँग्रेसकडून कडवी टक्कर मिळू शकते. सुरतमध्ये आपला फायदा मिळू शकतो, असे जाणकारांचे मत आहे. याभागात २०१२ मध्ये ७० टक्के मतदान झाले होते. २०१२ मध्ये भाजपाला ११५ जागांवर विजय मिळाला होता, २०१७ मध्ये या जागा घटून ९९ राहिल्या होत्या.
सुरतमधील सहाही पाटीदार बहुल जागांवर मतदानाची टक्केवारी घसरली आहे. या जागांवर भाजपाचे विजयाचे अंतर कमी झाले होते. ते आता आणखी कमी झाले तर य़ा जागा आयत्या आप किंवा काँग्रेसच्या ताब्यात जाण्याची भीती भाजपाच्या नेत्यांना वाटत आहे.