Gujarat Election 2022: गुजरातच्या उत्तर जामनगर मतदारसंघातून भाजप उमेदवार आणि क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा सध्या चांगलीच चर्चेत आहेत. नुकतेच तिने निवडणूक प्रचाराच्या एका पोस्टरमध्ये रवींद्र जडेजाचा भारतीय संघाच्या जर्सीमधला फोटो वापरला होता. हे पोस्टर तिने ट्विट केले होते, पण यामुळे नवीन वादाला तोंड फुटले. अखेर वाढत्या वादानंतर रिवाबाने तिचे ट्विट हटवले.
रिवाबाच्या ट्विटचा आपच्या आमदाराने तीव्र शब्दात निषेध केला होता. याशिवाय, ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीनचे प्रवक्ते वारिस पठाण यांनीही या फोटोवरुन थेट BCCIलाच जाब विचारला होता. 'भारतीय क्रिकेट संघाची जर्सी परिधान करुन राजकीय पक्षाच्या प्रचारात सहभागी होणे, हे बीसीसीआयच्या कराराचे उल्लंघन नाही का,' असा प्रश्न त्यांनी विचारला होता. वाद वाढल्यानंतर रवींद्र जडेजाने रिट्विट केलेले ट्विट हटवले. तसेच रिवाबाच्या अकाऊंटवरुनही ते ट्विट डिलीट करण्यात आले आहे.
भाजपने धर्मेंद्रसिंग जडेजाला बाजूला केलेभाजपने उत्तर जामनगरमधून रिवाबाला उमेदवारी दिली आहे. रिवाबाला कोणताही राजकीय अनुभव नाही किंवा तिने यापूर्वी कोणत्याही निवडणुकीत भाग घेतलेला नाही. रिवाबाची आमदारपदाची ही पहिलीच निवडणूक असेल. विशेष म्हणजे, भाजपने विद्यमान आमदार धर्मेंद्र सिंह जडेजा यांना डावलून रिवाबाला तिकीट दिले आहे. भाजपचे हे पाऊल सर्वांनाच आश्चर्यचकित करणारे आहे. पण ही निवडणूक जिंकणे रिवाबासाठी आव्हानात्मक ठरणार आहे, कारण रवींद्र जडेजाची बहीण नयाबा उत्तर जामनगर मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करत आहे.