नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. यावेळी गुजरातमध्ये भाजपासमोर अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षानं मोठं आव्हान उभं केलं आहे. त्या पार्श्वभूमीवर गुजराजमध्ये भाजपाच मोठ्या बहुमतासह विजयी होईल आणि निवडणूक जिंकल्यावर भूपेंद्र पटेल हेच मुख्यमंत्रिपदी कायम राहतील, असा विश्वास अमित शाह यांनी व्यक्त केला आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन भारात आला असताना नेटवर्क १८ ला दिलेल्या मुलाखतीमध्ये अमित शाह यांनी गुजरातमधील भाजपाची रणनीतीबाबत भाष्य केले. तसेच अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला गुजरातची जनता स्वीकारणार नाही, असा दावाही त्यांनी केला. या मुलाखतीमध्ये अमित शाह यांना गुजरातमध्ये भाजपाला किती जागा मिळतील, असे विचारले असता अमित शाह म्हणाले की, गुजरातमध्ये भाजपाला किती जागा मिळतील, याचा आकडा आताच सांगण खूप घाईचं ठरेल. मात्र भाजपा येथे आधीचे सर्व विक्रम मोडून सर्वाधिक जागा आणि सर्वाधिक मतं मिळवून विजयी होईल आणि बहुमतासह सरकार स्थापन करेल एवढं मी निश्चितपणे सांगतो.
यावेळी गुजरातमध्ये भाजपाचा विजय झाल्यास भावी मुख्यमंत्री कोण असेल, असं विचारलं असता अमित शाह यांनी गुजरातच्या भावी मुख्यमंत्र्यांचं नावही स्पष्टपणे सांगितले. गुजरातमध्ये भाजपाला बहुमत मिळावल्यावर गुजरातमध्ये भूपेंद्र पटेल हेच मुख्यमंत्री बनतील, त्यामध्ये कुणाचंही दुमत नाही आहे, असे अमित शाह म्हणाले. गुजरात विधानसभेच्या १८२ जागांसाठी दोन टप्प्यात १ आणि ५ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.