"लोकांना मुर्ख बनवण्यासाठी भाजपा राम मंदिर बांधतेय; नोकरी मिळणार का?"
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2022 07:17 PM2022-11-25T19:17:28+5:302022-11-25T19:22:49+5:30
भाजपाने मूर्ख बनवण्यासाठी मंदिर बांधलंय. भाजपाने हिंदूंचा ठेका घेतला आहे. राम मंदिर बांधले तर काय फरक पडणार? असा सवाल वाघेला यांनी उपस्थित केला.
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. प्रचारावेळी आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. यातच गुजरात काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शंकर सिंह वाघेला यांनी भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. अयोध्येतील राम मंदिर भाजपाने मूर्ख बनवण्यासाठी बांधले. राम मंदिर बांधले तर काय फरक पडणार? राम मंदिर बांधल्यावर कुणाला नोकरी मिळेल का? असा सवाल वाघेला यांनी उपस्थित केला.
वाघेला एवढ्यावरच थांबले नाहीत तर ते म्हणाले की, भाजपाने मूर्ख बनवण्यासाठी मंदिर बांधलंय. भाजपाने हिंदूंचा ठेका घेतला आहे. राम मंदिर बांधले तर काय फरक पडणार? मीही मंदिराचा विश्वस्त आहे. देवाची बाब ही व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे. राम मंदिर ही मार्केटिंगची गोष्ट नाही आणि भारत माताही नाही. मंदिर बांधले तर लोक दर्शनाला जातील. ५०० फूट उंचीचे मंदिर बांधा, मग ते सोन्याचे असले तरी. सोमनाथमध्ये तर आहेच पण त्याचे मार्केटिंग करू नका. त्याचा राजकारणात वापर होत आहे. अडवाणींची रथयात्रा ही राजकीय स्वार्थासाठी होती. भाजपाने केवळ स्वतःसाठी राम मंदिर बनवले आहे, लोकांना मूर्ख बनवण्यासाठी केलंय अशी टीका त्यांनी केली. टीव्ही ९ च्या मुलाखतीत त्यांनी हे म्हटलं.
तसेच राम मंदिराच्या उभारणीला कोणीही रोखत नाही, पण आमच्या रोजी रोटीच्या समस्येवरही तोडगा काढा. मूलं बेकार आहे, त्याला नोकरी द्या. भ्रष्टाचाराशिवाय कोणतेही काम होत नाही, तेही काढून टाका. शिक्षण शुल्क इतके वाढले आहे की मुलांना शिक्षण घेता येत नाही. काका आजारी आहेत, त्यांना रुग्णालयात दाखल करू शकत नाही. सर्वसामान्यांसाठी हे राममंदिर आहे. भाजपाने जनतेची फसवणूक केली आहे असंही वाघेला पुढे म्हणाले. दरम्यान, हिंदू नेत्यांनी ठेका घेतला आहे, त्यांच्या मुलींचे लग्न कुठे झाले? मी अशा १०० हिंदू नेत्यांना ओळखतो ज्यांच्या मुलींचे लग्न मुस्लिम कुटुंबात झाले आहे. ते मुस्लीम जावई स्वीकारतात असा वाघेला यांनी दावा केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"