Gujarat Election 2022 : गुजरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच गुजरातचा दौरा केला आणि या दरम्यान त्यांनी भाजपा उमेदवाऱ्यांची भेट घेतली. भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा याची पत्नी रिबावा ही उत्तर जामनगर मतदार संघातून भाजपाच्या तिकिटावर उभी राहिली आहे आणि जडेजा पत्नीसाठी जोरदार प्रचार करतोय... पण, जडेजाची बहिण व वडील हे काँग्रेसच्या उमेदवाराचा प्रचार करत आहेत. जडेजाची बहीण आणि काँग्रेस नेत्या नयनाबा जडेजा यांनीही रिवाबावर जोरदार टीका करत असताना आता क्रिकेटपटूचे वडील अनिरुद्धसिंग जडेजा यांनीही सूनेविरूद्ध दंड थोपटले आहेत.
भाजपने जामनगर उत्तरमधून रिवाबाला उमेदवारी दिली आहे. १४ नोव्हेंबर रोजी तिने शेकडो समर्थकांसह जामनगरमधून उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शक्तीप्रदर्शन म्हणून, भाजपने रिवाबाच्या समर्थनार्थ एक भव्य कार्यक्रम देखील आयोजित केला होता. या कार्यक्रमात रिवाबाचे पती रवींद्र जडेजा देखील सहभागी झाला होता. आता जडेजाचे वडील व रिवाबाचे सासरे अनिरुद्धसिंग यांनी काँग्रेसच्या उमेदवाराला निवडून आणा, असे आवाहन केले आहे. त्यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात ते म्हणत आहेत की,''मी अनिरुद्ध जडेजा मतदारांना आवाहन करतो की काँग्रेस उमेदवार भुपेंद्रसिंग जडेजा यांना विजयी करा. ते माझ्या मोठ्या भावासारखे आहेत. राजपूत येथील मतदारांना मी विशेष आवाहन करतो की त्यांनी भुपेंद्रसिंग यांना मतदान करावे.''
उत्तर जामनगर येथून जडेजाची बहिण नयनाबा ही पण काँग्रेसच्या तिकिटावर लढण्यासाठी उत्सुक होती. पण, रिवाबाचे नाव भाजपाने जाहीर केले आणि त्यानंतर काँग्रेसने नयनाबाचे नाव मागे घेतले आणि भुपेंद्रसिंग यांना तिकीट दिले.