गुजरात निवडणूक - 'भाजपाने पसरवली काँग्रेस उमेदवारांची खोटी यादी'
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2017 11:51 AM2017-11-20T11:51:44+5:302017-11-20T12:00:32+5:30
गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अधिकृतपणे आपली उमेदवार यादी जाहीर करण्याच्या आधीच भाजपाने खोटी यादी पसरवली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे
नवी दिल्ली - भारतीय जनता पक्षाने काँग्रेस उमेदवारांची खोटी यादी पसवरुन गोंधळ निर्माण केल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस अधिकृतपणे आपली उमेदवार यादी जाहीर करण्याच्या आधीच भाजपाने खोटी यादी पसरवली असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. इतकंच नाही तर काँग्रेसने ही यादी सोशल मीडियावर परसवण्यासाठी प्रदेशाध्यक्षांच्या खोट्या स्वाक्षरीचा वापर केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
'आमच्या आयटी सेलने तपास केला असता भाजपाच्या वेबसाईटसाठी वापरण्यात आलेल्या फोनवरुनच ही यादी प्रसिद्ध झाल्याचं समोर आलं आहे', असा आरोप गुजरात काँग्रेसचे प्रवक्ते मनिष दोषी यांनी केला आहे. 'खोटी यादी पसरवत भाजपाला अशी नौटंकी करण्याची गजर का आहे ? याचं उत्तर त्यांनी लोकांना द्यायला हवं. त्यांना जाहीर माफी मागितली पाहिजे', असं मनिष दोषी बोलले आहेत.
Letter pad of Congress & signatures of our President have been misused to circulate false list on social media. Upon investigation by our IT cell, it was found the phone used for BJP's website was used to circulate the list.: Manish Doshi, Gujarat Pradesh Congress Committee spox pic.twitter.com/bTddDn7Km3
— ANI (@ANI) November 19, 2017
गुजरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भरतसिंह सोलंकी यांनीदेखील आपली खोटी स्वाक्षरी असलेली उमेदवार यादी ट्विटरवर व्हायरल होत असल्याचं सांगितल आहे. 'काँग्रेसने अशी कोणतीही यादी जाहीर केली नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे. उमेदवार कोण असतील हे ठरवण्याचा अधिकार मला नाही. उमेदवारांची नावं दिल्लीत काँग्रेस कमिटीकडूनच जाहीर होतात', असं त्यांनी सांगितलं आहे.
BJP must answer people why did it resort to such gimmick & circulated the false list. It must apologise to the public: Manish Doshi, Gujarat Pradesh Congress Committee spokesperson on false list of Congress candidates circulating on social media pic.twitter.com/yaZfQtCHrs
— ANI (@ANI) November 19, 2017
'गुजरातमध्ये काँग्रेसची प्रसिद्धी वाढत असल्या कारणाने भाजपा घाबरली आहे', असा टोला भरतसिंह सोलंकी यांनी लगावला आहे. 'राहुल गांधींच्या नवसर्जन यात्रेला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, मतदारांना भाजपाला सत्तेतून खाली खेचण्याचा निर्णय घेतला आहे', असंही ते बोलले आहेत.
यादी जाहीर होताच पाटीदार आणि काँग्रेस समर्थकांमध्ये राडा -
गुजरात निवडणुकीत हातात हात घालून निवडणूक लढण्याच्या तयारीत असलेल्या काँग्रेस आणि पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाला. पटेलांचं वर्चस्व असलेल्या सुरतमधील वरच्चा रोड येथून काँग्रेसने प्रफुल्ल तोगडिया यांना उमेदवारी दिली असून त्यांच्या कार्यालयाजवळच दोन्ही कार्यकर्ते आपापसांत भिडले. यावेळी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. तिकीट वाटपात आपल्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या सदस्यांनी केला आहे. काँग्रेसने रात्री उशिरा 77 उमेदवारांची आपली पहिली यादी जाहीर केली. काँग्रेसच्या यादीत पाटादीर अनामत आंदोलन समितीच्या दोन नेत्यांच नाव होतं.