गुजरात निवडणूक : कच्छच्या रणात फुटला घाम! भाजपचा मार्ग खडतर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2022 10:25 AM2022-11-30T10:25:33+5:302022-11-30T10:26:10+5:30
इतर भागांच्या तुलनेत प्रचाराचा जोर अधिक; भाजपचा मार्ग खडतर
रमाकांत पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
भूज : कच्छच्या रणात सध्या राजकारणाचा रंग भरला आहे. भाजपाचा गड मानल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात तीन ठिकाणी पक्षाने उमेदवार बदलल्याने अंतर्गत राजकारण आणि आम आदमी पार्टीची ‘एन्ट्री’ यामुळे जागा टिकविण्यासाठी नेत्यांची पुरती दमछाक होत आहे.
कच्छ जिल्हा हा विस्ताराने देशातील सर्वात मोठा जिल्हा मानला जातो. या जिल्ह्यात विधानसभेचे एकूण सहा मतदारसंघ असून, गेल्या निवडणुकीत पाच जागा भाजपाने मिळविल्या होत्या. यावेळी देखील त्या पाच जागांसह काँग्रेसकडे असलेली रापर विधानसभेची जागाही मिळविण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे; पण काँग्रेस आणि आम आदमी पार्टीनेही पक्षापुढे आव्हान उभे केले असून, पक्षांतर्गत नाराजीचीही धुसफूस सुरू असल्याने भाजपाचा मार्ग वाळवंटातील प्रवासाप्रमाणे कष्टमय झाला आहे.
चार दिवसांत भाजपातर्फे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण आणि गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल या तीन मुख्यमंत्र्यांसह सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही सभा झाली. तर काँग्रेसतर्फे अशोक गेहलोत यांच्या सभा झाल्या.
आशियातील सर्वात श्रीमंत गावात काय होणार?
आशिया खंडातील सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या मधापूर गावात तर राजकारणाची चुरस अधिकच दिसून येत आहे. हे गाव भुज मतदारसंघात येत असून, याठिकाणी सर्वच पक्षांनी प्रचाराची कुठलीही कसर बाकी ठेवली नसल्याचे दिसून येते.
भाजपने यावेळी उमेदवारी देताना संघटनात्मक काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांना संधी दिली आहे. त्यामुळे भुज, अंजार आणि मांडवी या तीन ठिकाणी विद्यमान आमदारांऐवजी अनुक्रमे भाजपचे कच्छ जिल्हा प्रमुख केशूभाई पटेल, उपप्रमुख त्रिकम छांगा आणि जिल्हा महामंत्री अनिरुद्ध दवे यांना उमेदवारी दिली आहे.
मांडवीत आपचे आव्हान
कच्छमधील सहा जागांपैकी मांडवीमध्ये ‘आप’ने कडवे आव्हान दिले आहे. त्यामुळे भाजपला जागा राखण्यासाठी चांगलीच दमछाक करावी लागत आहे. काँग्रेसतर्फेही जोरदार आव्हान उभे करण्यात आले आहे. जिल्ह्यातील रापर येथील जागा कायम ठेवण्यासाठी येथे विद्यमान आमदार संतुकबेन अरेठिया यांच्या जागी काँग्रेसने त्यांचे पती बच्चूभाई अरेठिया यांना उमेदवारी दिली आहे.
भूकंपग्रस्तांच्या लहरींनी राजकारणात हेलकावे !
भचाऊ (भूज) : २००१मध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपाचा केंद्रबिंदू ठरलेले भचाऊ आज पुन्हा नव्या उमेदीने उभे झाले आहे. या तालुक्यातील बहुतांश भाग रापर विधानसभा क्षेत्रात येत असून, गेल्या २० वर्षांत येथील मतदारांनी कुठल्याही एका पक्षाला स्थिरता दिली नसून, भूकंपाच्या लहरीप्रमाणेच राजकारणही हेलकावत ठेवले आहे. त्यामुळे या निवडणुकीत येथे कोण बाजी मारेल, याकडे कच्छचे लक्ष केंद्रित झाले आहे. कच्छमधील भचाऊ तालुक्यातील बहुतांश भाग रापर विधानसभा मतदार संघात येतो. २००१मध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाची सर्वाधिक क्षती या भागाला पोहोचली होती. मतदार संघात फिरताना नागरिकांमध्ये महागाईबाबत मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येते. भाजपने येथे काही प्रमाणात कामही केल्याचे नागरिकांनी सांगितले.