ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) प्रमुख असदुद्दीन ओवेसी (Asaduddin Owaisi) यांनी रविवारी गुजरातमध्ये एका सभेला संबोधित केल. मात्र हे करत असताना त्यांना निषेधाचा सामना करावा लागला आहे. ओवेसी यांचा पक्ष गुजरातमध्ये जवळपास 36 जागांवर निवडणूक लढवत आहे. याच दरम्यान, सूरतमध्ये एका जाहीर सभेत तरुणांनी ओवेसींना काळे झेंडे दाखवत मोदी-मोदीच्या घोषणा देत विरोध केल्याची घटना आता समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ओवेसी यांना काळे झेंडे दाखवण्यात आले. तसेच त्यांच्या स्वागतावेळी सभेमध्ये मोदी-मोदीच्या घोषणा देण्यात आल्या. ओवेसी यांच्या निषेधाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ओवेसींनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ओवेसी सुरत पूर्व मतदारसंघातून आपल्या पक्षाच्या उमेदवाराच्या सभेला पोहोचले होते. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी आमदार वारिस पठाणही उपस्थित होते.
असदुद्दीन ओवेसी यांनी व्यासपीठावर भाषण सुरू करताच तेथे उपस्थित लोकांनी घोषणाबाजी करत निषेध केला. तरुणांनी मोदी-मोदीच्या घोषणा देत त्यांना काळे झेंडे दाखवले. या घोषणाबाजीने सभेत उपस्थित AIMIM नेते अस्वस्थ झाले.
गेल्या आठवड्यात असदुद्दीन ओवेसी वंदे भारत ट्रेनमधून प्रवास करत होते, प्रवासादरम्यान ट्रेनवर दगडफेक करण्यात आली होती. ओवेसींना लक्ष्य करत वंदे भारत ट्रेनवर दगडफेक केल्याचा आरोप AIMIM ने केला होता. पण AIMIM चे हे दावे पोलिसांनी फेटाळून लावले. अलीकडेच आपच्या अरविंद केजरीवाल यांनाही गुजरातमध्ये विरोधाचा सामना करावा लागला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.