सूरत - नुकतेच केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तारखा घोषित केल्या. यानिमित्ताने गुजरातच्या मागील निवडणुकींचा आढावा घेतला जात आहे. १९८५ च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने असा इतिहास रचला होता, जो आजपर्यंत कोणीही मोडू शकले नाही. माधवसिंह सोलंकी यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवून काँग्रेसने १८२ जागांच्या विधानसभेत १४९ जागा जिंकल्या होत्या. इतर कोणताही पक्ष आतापर्यंत या आकडेवारीच्या जवळपासही पोहोचलेला नाही. त्याआधी म्हणजेच १९८० च्या निवडणुकीत काँग्रेसने स्वतः १४१ जागा जिंकल्या होत्या.
मात्र सर्वकाही सुरळीत राहिल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपा यावेळी हा विक्रम मोडू शकतो. अरविंद केजरीवाल हे भाजपाच्या विजयात सर्वात मोठी भूमिका बजावू शकतात, जे यावेळी गुजरातमध्ये भाजपाचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी असल्याचे सांगितले जात आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या उत्तराखंड आणि गोवा विधानसभा निवडणुकांच्या निकालांवरून असे दिसून येते की, या राज्यांमध्ये भाजपाने अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाच्या मतांच्या जवळपास समान टक्केवारीच्या फरकाने विजय मिळवला. निवडणुकीच्या गणितानुसार आम आदमी पक्ष या निवडणुकीच्या रिंगणात नसता तर ही मते काँग्रेसकडे गेली असती आणि या राज्यांमध्ये ते सरकार स्थापन करू शकले असते.
गुजरातमध्ये सध्या काय परिस्थिती?गुजरात विधानसभा निवडणुकीतही उत्तराखंड, गोव्यासारखी परिस्थिती दिसून येत असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. आम आदमी पक्ष जर येथे मजबूत झाला आणि काँग्रेसची पाच ते सात टक्के मतेही कमी करण्यात यशस्वी झाला, तर या मतविभागणीचा थेट फायदा भाजपाला होईल आणि ते मोठा विजय मिळवू शकतील. पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेमुळे येथे भाजपा आधीच मजबूत स्थितीत आहे. त्यांचे सरकार स्थापनेचीही जवळपास निश्चित मानलं जात आहे, मात्र यावेळी त्यांच्या विजयाचे अंतर कितपत असू शकते, अशी चर्चा आहे.
या जागांवर लक्ष केंद्रित२०१७ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाने १० हजार पेक्षा कमी मतांच्या फरकाने १२ हून अधिक जागा जिंकल्या होत्या. ८३ जागांवर भाजपाच्या उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले, तर ३० हून अधिक जागांवर भाजपा उमेदवारांच्या पराभवाचे अंतर केवळ २ हजार ते १० हजार मतांचे होते. त्यापैकी सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये सर्वाधिक जागा आहेत. या जागांवर बिगरभाजपा मतदारांमध्ये मतविभागणी झाल्यास त्याचा भाजपला फायदा होईल आणि त्यांचा विजयाचा मार्ग सुकर होईल. त्यामुळे त्यांच्या जागांची संख्या वाढणार असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.
गोव्यात असं बदललं समीकरणया वर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. या निवडणुकीत भाजपला ३३.३% मते मिळाली. काँग्रेसला २३.५% मते मिळाली. काँग्रेसला भाजपपेक्षा ९.८ टक्के कमी मते मिळाली. त्याच निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला ६.८ टक्के आणि ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला (AITC) ५.२ टक्के मते मिळाली. या निवडणुकीत आम आदमी पक्ष किंवा तृणमूल काँग्रेस नसती, तर बिगरभाजपा पक्ष म्हणून या मतदारांचा प्राधान्यक्रम काँग्रेसलाच राहिला असता आणि गोवा सहज जिंकता आला असता, असं बोललं जातं.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"