Arvind Kejriwal On PM Modi: आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष सक्रीय झाले आहेत. बडे नेते सातत्याने राज्याच्या दौऱ्यावर येत असून एकमेकांवर निशाणा साधत आहेत. भाजपच्या बाजूने वातावरण तयार करण्यासाठी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक बडे नेते प्रचार करत आहेत. दुसरीकडे, आम आदमी पार्टीसाठी दिल्लीचे सीएम अरविंद केजरीवाल यांनी प्रचाराची धुरा सांभाळली आहे.
दरम्यान, सोमवारी (10 ऑक्टोबर) पंतप्रधान पुन्हा एकदा गुजरात दौऱ्यावर आले. नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यात कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली. यावेळी त्यांनी विरोधी पक्षांवर जोरदार निशाणा साधला. काँग्रेसबाबत पीएम मोदी म्हणाले की, "काँग्रेस गुजरातमध्ये निष्क्रिय दिसत आहे, पण त्यांची लोक शांतपणे शहरे आणि खेड्यापाड्यात प्रचार करत आहेत. काँग्रेस लोकांना भाजपच्या विरोधात मतदान करण्यास सांगत आहे."
केजरीवालांची टीकापंतप्रधान मोदींच्या या वक्तव्यानंतर आम आदमी पार्टीचे संजोयक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपला खोचक सवाल केला. अरविंद केजरीवाल यांनी ट्विट केले की, "पंतप्रधान गुजरातमध्ये काँग्रेसचा प्रचार करत आहेत का?" अरविंद केजरीवाल हे सातत्याने गुजरातच्या दौऱ्यावर येत आहेत आणि त्यांनी राज्यातील जनतेला मोफत वीज, मोफत शिक्षण अशी अनेक आश्वासने देत आहेत.