अहमदाबाद - गुजरात विधानसभा निवडणुकीची तारीख जसजशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राज्यातील वातावरण अधिक तापू लागले आहे. सर्वच राजकीय पक्षांचा जोरदार प्रचाराचा धडाका सुरू आहे. सोमवारपासून (27 नोव्हेंबर) पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. येथील जनसभांना ते संबोधित करणार आहेत. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुजरातमध्ये चार सभांना संबोधित करणार आहेत. भुज, जसदण, धारी अमरेली व कमरेज येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा होणार आहेत. प्रचार सभांचा प्रारंभ करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी आशापुरा मातेच्या मंदिरात जाऊन दर्शन घेणार आहेत.
दरम्यान, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी जवळपास एक महिन्यापासून गुजरातचा दौरा करत आहेत, येथील जनतेशी संवाद साधत आहेत. या दौ-यादरम्यान त्यांनी पंतप्रधान मोदी यांच्यासहीत गुजरातमधील भाजपा सरकारवर निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राहुल गांधी यांच्या टीकांना प्रत्युत्तर देण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी गुजरातमध्ये जवळपास 30 जाहीर सभा घेण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ट्विट करत म्हटले होते की, सोमवारपासून गुजरातमध्ये निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांचा दौरा सुरू होणार आहे. माझी पहिली सभा भूजमधील कच्छ येथे असणार आहे. हा जिल्हा माझ्यासाठी खूप जवळचा आहे. 2001मध्ये आलेल्या भूकंपानंतर जगानं पाहिलंय की येथे कशापद्धतीनं प्रगती झाली आहे. ज्यामुळे समाजाच्या प्रत्येक वर्गाला फायदा प्राप्त झाला आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 29 नोव्हेंबरला सोमनाथ येथील प्राची, भावनगरच्या पालिताणा आणि नवसारी येथे सभा होणार आहे. या सर्व भागांत 9 डिसेंबरला पहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे.
आतापर्यंत 148 उमेदवारांच्या नावाची घोषणा दरम्यान, भाजपानं आतापर्यंत 182 जागांपैकी 148 जागांसाठी आपल्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. भाजपाकडून 5 याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत 70, दुस-या यादीत 36, तिस-या यादीत 28, चौथ्या यादीत 1 आणि पाचव्या यादीत 13 उमेदवारांचे नाव घोषित करण्यात आले होते.