काँग्रेसनेगुजरातमध्ये भाजप विरोधात दंड थोपटले आहेत. आता काँग्रेस येथे भाजपचे अपयश जनतेसमोर ठेवण्यासाठी 'आरोपपत्र' जारी करणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे गुजरात प्रभारी रघु शर्मा यांनी सोमवारी यासंदर्भात माहिती दिली. काँग्रेसकडून जिल्हानिहाय आणि मतदारसंघांतून ही आरोपपत्रे जारी करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. गुजरातमध्ये याच वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होऊ शकतात.
राजकोट येथे पत्रकारांशी बोलताना शर्मा म्हणाले, "आम्ही स्थानिक पातळीवरील समस्या समजून घेत आहो. आम्ही भाजप सरकारविरोधात विधानसभानिहाय आणि जिल्हावार आरोपपत्र जारी करणार आहोत. तसेच, काँग्रेसचे सरकार आल्यास, या समस्यांना कशा पद्धतीने सामोरे जाणार, यासंदर्भात आम्ही आमच्या निवडणूक जाहीरनाम्याच्या माध्यमाने जनतेला विश्वास देऊ.
शर्मा जिल्हास्तरीय चिंतन शिबिरासाठी राजकोट येथे आले होते. तसेच, या कार्यक्रमाला AICC सचिव रामकिशन ओझा हेही उपस्थित होते. ओझा देखील गुजरातचे प्रभारी आहेत. याशिवाय, या कार्यक्रमाला गुजरात विधानसभेतील माजी विरोधी पक्षनेते परेश धनानी आणि काँग्रेसचे स्थानिक आमदार आणि पक्षाचे नेतेही उपस्थित होते.
शर्मा म्हणाले, “येथे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न आहे. जिल्यातील रस्तेही प्रचंड खराब झाले आहेत. ते देशभर स्वच्छ भारतची घोषणा देतात आणि शौचालये बांधण्याची भाषा करतात. मात्र येथील लोकांना प्यायलाही पाणी नाही. एवढेच नाही, तर नाल्याचे पाणीही गावातील नद्यांमध्ये जात असल्याचे ते म्हणाले.