गुजरात विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीतील सुरुवातीच्या आकडेवारीनुसार भाजपा (BJP) उमेदवार १४९ जागांवर पुढे असून काँग्रेसही (Congress) २३ जागांवर आघाडी घेतल्याचं दिसून येते. तर, आम आदमी पक्ष (AAP) ८ जागांवर पुढे आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे.
गुजरात विधानसभेच्या या निवडणुकीत काही महत्वाच्या मतदारसंघावर सर्वांचं लक्ष लागून होतं, त्यामधील एक म्हणजे मोरबी मतदारसंघ. या निवडणुकीच्या प्रचाराच्या काही दिवसांपूर्वीच मोरबी मतदारसंघातील माछू नदीवरील केबल पुल कोसळला होता. यामध्ये १३५पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद प्रचारामध्येही दिसून आले. त्यामुळे मोरबी मतदारसंघातील नागरिक कोणत्या उमेदवाराला निवडणून देणार, याची चर्चा रंगली होती.
मोरबी मतदारसंघात भाजपाचे अमृतिया कांतिलाल शिवलाल आणि काँग्रेसचे जयंतीलाल जिराभाई पटेल यांच्या मुख्य लढत होती. यामध्ये सुरुवातीच्या आकडेवारीनूसार, भाजपाचे उमेदवार अमृतिया कांतिलाल शिवलाल आघाडीवर आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार जयंतीलाल जिराभाई पटेल पिछाडीवर आहे.
२०१७च्या विधानसभा निवडणुकीत मोरबी मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार ब्रिजेश मेरजा आणि भाजपाचे अमृतिया कांतिलाल शिवलाल यांच्यात लढत रंगली होती. या लढतीत काँग्रेसचे ब्रिजेश मेरजा यांनी बाजी मारली होती. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला होता. मात्र भाजपाने ब्रिजेश मेरजा यांना २०२२च्या निवडणुकीत उमेदवारीची तिकीट दिली नव्हती.
हार्दिक पटेलने केली मोठी भविष्यवाणी-
भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हार्दिक पटेल यांनी भविष्यवाणी केली आहे. त्यांच्या पक्षाला १३५ ते १४५ पेक्षा जास्त जागा जिंकतील. भाजपाने असा विजय मिळवला तर आजपर्यंतचा सर्वात मोठ्ठा विजय ठरेल. तसेच राज्यात सातव्यांदा भाजपाचे निर्विवाद सरकार स्थापन होईल, असा विश्वासही हार्दिक पटेल यांनी व्यक्त केला.
दरम्यान, गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या अखेरीस गुजरातमध्ये अंदाजे ५९.११ टक्के मतदान झाले. १ डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान, गुजरातमध्ये एकूण ६३.१४ टक्के मतदान झाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"