गुजरात विधानसभा २०२२ निवडणुकांच्या मतमोजणीतील सुरुवातीच्या आकडेवारीनुसार भाजपा (BJP) उमेदवार १५२ जागांवर पुढे असून काँग्रेसही (Congress) २० जागांवर आघाडी घेतल्याचं दिसून येते. तर, आम आदमी पक्ष (AAP) ६ जागांवर आणि अपक्ष ४ जागांवर पुढे आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपाला स्पष्ट बहुमत मिळत असल्याचे दिसून येत आहे.
गुजरात विधानसभेच्या निवडणुकांचा इतिहास पाहिल्यास भाजपला यंदा मिळत असलेलं यश हे सर्वात मोठं असल्याचं दिसून येतं. मोदींच्या नेतृत्वात भाजपने १० वर्षे गुजरातची सत्ता राखली. तर, गेल्या २७ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपचे कमळच सत्तेवर आहे. त्यानुसार, आत्तापर्यंतच्या विजयानुसार २००२ मध्ये गुजरातमध्ये भाजपला सर्वाधिक १२७ जागांवर विजय मिळाला होता. आजपर्यंतचा हा सर्वात मोठा विजय होता. मात्र, यंदा १५० जागांवर भाजपला विजय मिळण्याचा अंदाज आहे, त्यामुळे यंदा मोदी-शहांच्या नेतृत्त्वात भाजपने राजकीय चमत्कारच घडवला, असे म्हणता येईल.
२०१७च्या निवडणुकीत भाजपासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचंही थोडं दुर्लक्ष झालं होतं. २०१७मध्ये भाजपाला ९९ जागांवर समाधान मानावे लागले. जवळपास १६ जागा भाजपाने गमावल्या होत्या. तर काँग्रेसने मुसंडी मारत ७७ जागांवर विजय मिळवला होता. मात्र यंदा म्हणजेच २०२२च्या निवडणुकीत भाजपासह नरेंद्र मोदी, अमित शाह यांनी लक्ष केंद्रीत करत विजयासाठी रणनिती ठरवली होती. तसेच प्रचारात काँग्रेसने नरेंद्र मोदींना रावण असं संबोधलं होतं. त्याचा परिणामही दिसून आला. तसेच गुजरातमधील नागरिकांची नरेंद्र मोदींना आपुलकी मिळाल्यानेच यंदा भाजपा मोठ्या विजयाच्या उंबरठ्यावर आहे.
भाजपाचा विक्रमी विजय आणि काँग्रेसच्या दारूण पराभवाची पाच कारणं-
१. मोदींचा करिष्मा
२. शाहांची स्ट्रॅटेजी
३. अनुभवातून आलेलं शहाणपण
४. काँग्रेसने लढाईआधीच मानलेली हार/न केलेला प्रचार
५. आपमुळे झालेलं मतविभाजन
दरम्यान, गुजरातमध्ये १ आणि ५ डिसेंबरला दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. गुजरात निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याच्या अखेरीस गुजरातमध्ये अंदाजे ५९.११ टक्के मतदान झाले. १ डिसेंबर रोजी पहिल्या टप्प्यातील मतदानादरम्यान, गुजरातमध्ये एकूण ६३.१४ टक्के मतदान झाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"