गुजरातमध्ये न भूतो, न भविष्यती असे यश मिळविल्यानंतर भाजपाने शपथविधीच्या हालचाली सुरु केल्या आहेत. गुजरातमध्ये मुख्यमंत्री असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही एवढे यश मिळाले नव्हते तेवढे मोदींच्या प्रभावामुळे मिळाले आहे. भाजपाला १८२ पैकी १५४ जागांवर यश मिळत आहे. तर काँग्रेससाठी एवढी मोठी नामुष्की आजवर आलेली नव्हती, त्यांना १९ जागा मिळताना दिसत आहेत.
गुजरातमध्ये सध्याचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदी विराजमान होण्याची शक्यता आहे. विजय रुपाणी यांच्या नेतृत्वात बदल करून भाजपाच्या पक्ष श्रेष्ठींनी पटेल यांना संधी दिली होती. त्यांच्या नेतृत्वात भाजपाने घवघवीत यश मिळाले आहे. यामुळे पुन्हा त्यांनाच संधी दिली जाण्याची शक्यता आहे. याचबरोबर मोदींचे धक्कातंत्र पाहता ते दुसऱ्या नेत्याला संधी देण्याचीही शक्यता नाकारता येत नाहीय
आज निकालाची प्रमाणपत्रे हाती आल्यानंतर १० किंवा ११ डिसेंबरला गुजरातमध्ये शपथविधी समारंभ होण्याची शक्यता आहे. या सरकारमध्ये हार्दिक पटेलसारख्या नेत्यांनाही मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. या शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.
आप'च्या आक्रमक निवडणूक प्रचारामुळे यावेळी भाजपाला गुजरातमध्ये अधिक मेहनत घ्यावी लागली असं म्हटलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह 10 हून अधिक केंद्रीय मंत्री, चार मुख्यमंत्री, तीन राज्यांचे उपमुख्यमंत्री आणि विविध राज्यांच्या 50 हून अधिक मंत्र्यांनी अनेक बैठका घेतल्या. मीडिया रिपोर्ट्सनुसार, फक्त पंतप्रधानांनी गुजरातमध्ये 39 सभा घेतल्या आणि 134 विधानसभा मतदारसंघ कव्हर केले. पंतप्रधान मोदींशिवाय गृहमंत्री अमित शाह यांनीही गुजरात निवडणुकीत पूर्ण ताकद लावली. शाह यांनी 23 रॅलींद्वारे 108 विधानसभा मतदारसंघ कव्हर केले होते. त्याचाच फायदा भाजपाला झाला आहे.