गुजरातची निवडणूक आपला एक मोठे यश मिळवून देणारी ठरणार आहे. काल दिल्ली महापालिकेत विजय मिळविल्यानंतर आजच आपसाठी गुजरात निवडणूक महत्वाची होती. गेल्या निवडणुकीला आपने गुजरातमध्ये ३६ उमेदवार रिंगणात उतरविले होते. परंतू, या सर्वांची डिपॉझिट जप्त झाली होती. परंतू, यावेळच्या निवडणुकीत आपने भाजपाची झोप उडविली आहे.
गुजरातमध्ये आपला अद्यापपर्यंत झालेल्या मतमोजणीत १४ टक्के मतदान झाल्याचे दिसत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार भाजपाला ५३.४ टक्के मतदान झाले आहे. तर आपला १३.५१ टक्के मतदान झाले आहे. काँग्रेसला २६.६२ टक्के मतदान झाले आहे.
दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी आप राष्ट्रीय पक्ष बनल्याचे म्हटले आहे. गुजरातच्या जनतेच्या मतांमुळे आम आदमी पार्टी आज राष्ट्रीय पार्टी बनत आहे. शिक्षण आणि आरोग्याच्या राजकारणात पहिल्यांदाच राष्ट्रीय राजकारणात ओळख बनू लागली आहे. यासाठी संपूर्ण देशवासियांना शुभेच्छा असे ट्विट सिसोदिया यांनी केले आहे. आपची दिल्लीत दुसऱ्यांदा सत्ता आली आहे. पंजाबमध्येही आप सत्तेत आली आहे. गोव्यात दोन आमदार आहेत. असे असताना गुजरातमध्ये आज जर आपचे आमदार निवडून आले तर चार राज्यांत आपचे अस्तित्व निर्माण होणार आहे. यानंतर आप कर्नाटकात निवडणूक लढविणार आहे.