जामनगर : गुजरात विधानसभा निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेत असलेल्या जामनगर उत्तरमध्ये रिवाबा जडेजा म्हणजेच क्रिकेटर रवींद्र जडेजाच्या पत्नी निवडणूक लढवत असून त्या सुरुवातीपासूनच आघाडीवर आहेत. त्यांच्याविरोधात रवींद्र जडेजाची बहीण नयनाबा यांनीच उमेदवारी अर्ज भरला होता. त्यामुळे, आपल्या वहिनींच्या विरोधातच नयना यांनी प्रचारात रणशिंग फुंकले होते. याठिकाणी काँग्रेसकडून बिपेंद्रसिंह जडेजा हे काँग्रेस उमेदवार आहेत. मात्र, रिवाबा यांना पहिल्या तीन फेऱ्यांत आघाडी मिळाली आहे. विशेष म्हणजे रिवाबा यांचे सासरेही सुनेच्या विरोधात प्रचार करत होते. सुनेला नव्हे, तर काँग्रेसच्या उमेदवाराला विजयी करण्याचे आवाहन जडेजाचे वडील अनिरुद्ध सिंह जडेजा यांनी जनतेला केले होते.
यंदाच्या विधानसभा निवडणुकांत भाजपने जामनगर उत्तरमधून रिवाबा यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. 14 नोव्हेंबर रोजी त्यांनी शेकडो समर्थकांसह जामनगरमधून उमेदवारी अर्ज भरला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी शक्तीप्रदर्शन म्हणून, भाजपने रिवाबा यांच्या समर्थनार्थ एक भव्य कार्यक्रम देखील आयोजित केला होता. या कार्यक्रमात रिवाबा यांचे पती रवींद्र जडेजा देखील सहभागी झाले होते. रिवाबा यांना गुजरात विधानसभा निवडणुकीत तिकीट मिळणार असल्याची चर्चा फार पूर्वीपासून होती. जामनगरमधील भाजपशी संबंधित राजकीय कार्यक्रमांमध्ये त्या अनेकदा दिसल्या आहेत. त्या सौराष्ट्र करणी क्षत्रिय सेनेच्या अध्यक्षाही होत्या. आता, त्या भाजप उमेदवार असून निवडणूक जिंकल्यास पहिल्यांदाच आमदार बनणार आहेत.
निवडणूक आयोगाकडे केली होती तक्रार
क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी रिवाबा जडेजा विरोधात निवडणूक आयोगाकडे (EC) तक्रार दाखल करण्यात आली होती. मुलांसोबत निवडणूक प्रचार केल्याचा आरोप रिवाबा यांच्यावर आहे. काँग्रेस नेते सुभाष गुजराती यांनी बालमजुरीचा आरोप करत ही तक्रार केली -होती. यावेळी, रिवाबा यांच्यावरील आरोपांदरम्यान रवींद्र जडेजाची बहीण आणि काँग्रेस नेत्या नयनाबा जडेजा यांनीही रिवाबा यांना लक्ष्य केले होते.