Gujarat Election Results 2022: ऑक्टोबरमध्ये झालेल्या गुजरातच्या मोरबी पूल दुर्घटनेवरुन काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने भाजपवर जोरदार टीका केली होती. पण, या मतदारसंघात दोन्ही पक्षांना अपयशाचा सामना करावा लागला. पूल दुर्घटनेदरम्यान नदीत उडी घेऊन लोकांचा जीव वाचवणारे भाजपचे उमेदवार आणि मोरबीचे नायक कांतीलाल अमृतिया यांनी बंपर विजयाची नोंद केली आहे. यापूर्वी ते भाजपकडून 5 वेळा आमदार झाले आहेत. कांतीलाल यांना एकूण 113701 मते मिळाली आहेत. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार जयंतीलाल पटेल यांचा 61580 मतांनी पराभव केला. तिसऱ्या क्रमांकावर आम आदमी पक्षाचे पंकज रणसारिया होते.
ऑक्टोबरमध्ये झालेल्या पूल दुर्घटनेत कांतीलाल यांनी जीवाची पर्वा न करता नदीत उडी मारून अनेकांना वाचवले होते. त्यानंतर नोव्हेंबरमध्ये भाजपने विद्यमान आमदार आणि राज्य सरकारमधील मंत्री ब्रजेश मेरजा यांचे तिकीट कापून त्यांना संधी दिली. लोकांच्या सहानुभूती आणि पाठिंब्याच्या अपेक्षेनुसार कांतीलाल हे अतिशय चांगल्या फरकाने विजयी झाले आहेत. भाजपला 59.21 टक्के मते मिळाली.
2017 मध्ये भाजपच्या वतीने निवडणूक लढवणाऱ्या कांतीलाल अमृतिया यांना काँग्रेसच्या ब्रजेश मेर्जा यांच्यासमोर पराभव स्वीकारावा लागला होता. 2020 मध्ये ब्रजेश मेरजा यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ब्रजेश हे भाजपचे उमेदवार होते, मात्र यावेळी मोरबी पूल दुर्घटनेत कांतीलाल नायक म्हणून समोर आल्यानंतर पक्षाने ब्रजेश मेर्जाच्या जागी त्यांना संधी दिली आणि त्यांनी संधीचे सोनं केले.