Gujarat Election: काल गुजरात विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. सत्ता स्थापनेचे दावे करणाऱ्या दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या आम आदमी पार्टीला दोन अंकी आकडाही गाठता आला नाही. यानंतर आता 'द काश्मीर फाइल्स'चे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री (Vivek Agnihotri) यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला आहे.
निवडणुकीच्या निकालानंतर विवेकने 'द काश्मीर फाइल्स' या चित्रपटावरील टीकेची आठवण करून देत ट्विटरवरुन केजरीवालांचे अभिनंदन आणि खोचक टीका केली. त्यांनी ट्विटमध्ये अरविंद केजरीवाल यांनाही टॅग केले. अरविंद केजरीवाल यांनी गुजरात निवडणुकीपूर्वी पक्षाच्या विजयाचे मोठे दावे केले होते. त्यांच्या मुलाखतचे व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत. यावर रिट्विट करत विवेकने केजरीवालांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले विवेक अग्निहोत्री?
विवेक अग्निहोत्रीने एक व्हिडिओ क्लिप ट्विट करून लिहिले, ''विजयासाठी अरविंद केजरीवाल यांचे अभिनंदन. आता तुम्ही तुमचे विजयी भाषण YouTube वर विनामूल्य रिलीज करण्याची हीच वेळ आहे. ही खोटी नसून 'सत्यकथा' आहे.'' दरम्यान, द काश्मीर फाइल्स चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अरविंद केजरीवाल यांच्या एका वक्तव्याची खूप चर्चा झाली होती. अनेक राज्यांमध्ये हा चित्रपट करमुक्त करण्यात आला होता. यावरुन केजरीवाल म्हणाले होते की, ''चित्रपट दिग्दर्शक करोडोंची कमाई करत आहेत. सगळ्यांना चित्रपट दाखवायचाच असेल तर तो यूट्यूबवर फ्रीमध्ये टाकायला सांगा. करमुक्त करण्याची काय गरज आहे?''