मुंबई: आज गुजरातचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद झालं आहे. गुजरातमध्ये आज दुसऱ्या टप्प्यातील 14 जिल्ह्यांमध्ये 93 जागांसाठी मतदान झालं. यापूर्वी गुजरात विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील 19 जिल्ह्यांमध्ये 89 जागांसाठी 9 डिसेंबरला 68 टक्के मतदान झालं. गुजरातमधील 182 जागांमध्ये जनतेचा कौल कोणाला हे 18 डिसेंबरला समजेल. पण गुजरात विधानसभा निवडणूकीचा दुसरा टप्पा संपल्यानंतर आता हिमाचल प्रदेशसह दोन्ही राज्यांचे विविध न्यूज चॅनलने केलेले एक्झिट पोल समोर यायला सुरूवात झाली आहे. टुडेज चाणक्य-न्यूज 24 चा एक्झिट पोल देखील समोर आला असून यानुसार भाजपा कॉंग्रेसमध्ये एकहाती सत्ता स्थापन करेल, त्याहून महत्वाचं म्हणजे कॉंग्रेसचं या निवडणुकीत पाणीपत होईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
चाणक्यचा एक्झिट पोल -
भाजपाला 135 जागा ( 11 जागा कमी किंवा जास्त) कॉंग्रेसला 47 जागा ( 11 जागा कमी किंवा जास्त) आणि इतरांना 0 ते 3 जागांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हिमाचलमध्ये झालेल्या निवडणुकांबाबतही चाणक्यचा पोल आला असून यामध्ये भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 68 जागांपैकी भाजपाला 55 जागा ( 7 जागा कमी किंवा जास्त ), कॉंग्रेसला 13 जागा (7 जागा कमी किंवा जास्त) आणि इतरांना 3 जागांची शक्यता वर्तवण्यात आली आहे.