गुजरात : भाजपाला रोखण्यासाठी विरोधक एकवटले, ओबीसी नेता अल्पेश ठाकोर जाणार काँग्रेसमध्ये
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2017 09:55 PM2017-10-21T21:55:51+5:302017-10-21T21:56:01+5:30
गुजरातमधील ओबीसी एकता मंचचा नेता अल्पेश ठाकोर याने काँग्रेस पक्षाला समर्थन देण्याची घोषणा केली आहे. आपण 23 ऑक्टोबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करू, असे ठाकोर यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीनंतर जाहीर केले.
नवी दिल्ली - गुजरातमधील ओबीसी एकता मंचचा नेता अल्पेश ठाकोर याने काँग्रेस पक्षाला समर्थन देण्याची घोषणा केली आहे. आपण 23 ऑक्टोबरला काँग्रेसमध्ये प्रवेश करू, असे ठाकोर यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या भेटीनंतर जाहीर केले. यावरुन गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे पारडे जड होताना दिसत आहे. अल्पेश यांच्या या घोषणेमुळे उत्तर गुजरात आणि सौराष्ट्रात ओबीसीबहुल विधानसभा जागांवर काँग्रेसला मोठा फायदा होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
काँग्रेसचे गुजरातचे निवडणूक प्रभारी अशोक गेहलोत, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष भरतसिंह सोलंकी यांच्यासोबत अल्पेश ठाकोर यांनी राहुल गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना अल्पेश यांनी भाजपा हल्लाबोल चढवला. दरम्यान, 23 ऑक्टोबरला गुजरातमध्ये काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची सभा होणार आहे. या सभेत अल्पेश सहभागी होणार आहेत. या सभेसाठी 5 लाख नागरिक उपस्थित राहणार असल्याचा दावा अल्पेश ठाकोर यांनी केला आहे. दरम्यान, अल्पेश यांना बनासकांठामधून निवडणूक लढवायची आहे, अशी चर्चा आहे.
Rahul Gandhi would be coming to our rally on Oct 23 and I will join the Congress party: Alpesh Thakor,OBC Ekta Manch #GujaratElections2017pic.twitter.com/ItBZ8ofzfU
— ANI (@ANI) October 21, 2017