...तर गुजरातमध्ये काँग्रेसनं सत्ता स्थापन केली असती
By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2017 04:52 PM2017-12-19T16:52:52+5:302017-12-19T17:02:27+5:30
भाजपाविरोधी ताटातुटीमुळे काँग्रेस बहुमतापासून दूर राहिल्याचे समोर आले आहे. विरोधकांमध्ये एकी नसल्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसल्याची आकडेवारी समोर आली आहे.
अहमदाबाद - भाजपाविरोधी ताटातुटीमुळे काँग्रेस बहुमतापासून दूर राहिल्याचे समोर आले आहे. विरोधकांमध्ये एकी नसल्याचा सर्वाधिक फटका काँग्रेसला बसल्याची आकडेवारी समोर आली आहे. काल गुजरातमधील निकाल लागेल्या जागंमध्ये 12 जागा अशा आहेत तिथे अत्यंत कमी फरकाने विजय मिळवण्यात आला आहे. त्यापैकी तब्बल 8 ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निसटत्या फरकाने पराभूत झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे बालेकिल्ला म्हणून ओळखले जाणारे गुजरात हे राज्य राखण्यात भाजपाला कसेबसे यश मिळाले. 150 जागा जिंकणार असे भाकित करणाऱ्या मोदींनी गुजरात जिंकले पण, काठावरचे बहुमत मिळाल्यामुळे काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हेच बाजीगर ठरले आहेत. गुजरातमध्ये भाजपाला १८२ पैकी जेमतेम ९९ जागा तर काँग्रेसने ८0 जागांवर यश मिळविले आहे. तिथे बहुमतासाठी ९२ जागांची गरज होती.
गुजरात निवडणुकीत काँग्रेसला बहुमतासाठी 12 जागां कमी पडल्या. भाजपने 99 जागा जिंकत सहाव्यांदा सत्ता आपल्या ताब्यात ठेवली. निकाल लागेल्या जागंमध्ये 12 जागा अशा आहेत तिथे अत्यंत कमी फरकाने विजय मिळवण्यात आला आहे. त्यापैकी तब्बल 8 ठिकाणी काँग्रेसचा उमेदवार निसटत्या फरकाने पराभूत झाला आहे. काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस तर काही ठिकाणी बसपा तर काही ठिकाणी अपक्षांनी घेतलेल्या मतांमुळे काँग्रेसचा पराभव झाल्याचे चित्र समोर आले आहे.
भाजपाविरोधी मतांमध्ये फाटाफूट झाली नसती तर कदाचित काँग्रेसला गुजरातमध्ये बहुमत मिळालं असतं. 8 पैकी 3 जागांवर तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारामुळे काँग्रेसचे उमेदवार हरले आहेत. केवळ 327 मतांनी धोलका मतदारसंघात भाजपचा उमेदवार जिंकला. त्या ठिकणी बसपाच्या उमेदवाराने 3 हजारांपेक्षा जास्त तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराने 1100 पेक्षा जास्त मते घेतली. 2711 मतांनी फतेपुरा मतदारसंघात भाजपचा उमेदवार जिंकला. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 2747 मते मिळाली. डांग्ज मतदारसंघात भाजपचा उमेदवार केवळ 768 मतांनी जिंकून आला आहे. तर राष्ट्रवादीच्या उमेदवाराला 1304 मते मिळाली आहेत.
राहुल गांधींच्या देवदर्शनाचा काँग्रेसला लाभ -
निवडणुकीच्या निकालावर नजर टाकली तर राहुल गांधींच्या या टेम्पल रनचा काँग्रेसला जागांच्या रुपाने आशीर्वाद मिळाल्या दिसत आहे. द्वारकाचा अपवाद वगळता राहुल गांधींनी ज्या मंदिरांना भेट दिली त्या विधानसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. राहुल गांधींनी संपूर्ण गुजरातमध्ये एकूण 27 मंदिरांना भेट दिली त्यातील 18 मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत. द्वारकेतील द्वारकाधीश मंदिरापासून राहुल गांधींच्या ''टेम्पल रनला'' सुरुवात झाली होती. पण द्वारकेतून भाजपाचे पाबूभा मानेक सलग सातव्यांदा विजयी झाले.
राहुल गांधींनी अंबाजी मंदिर (दंता), बहुचराजी माता मंदिर (बेचरजी), चामुंडा माता मंदिरा (चटिला), स्वामिनारायण मंदिर (गाधाडा), अक्षरधाम मंदिर ( उत्तर गांधीनगर), वीर माया मंदिर (पाटण), सोमनाथ मंदिर, उमिया माता मंदिर (ऊँझा), शामलाजी मंदिर (भिलोडा), रणछोडजी मंदिर डाकोर (थासरा), कबीर मंदिर (दाहोड), रणछोडजी मंदिर (पेटलाड), उनाय माता मंदिर (वनसदा), खोदीयार माता मंदिर आणि सदाराम बापा मंदिर (राधनपूर), देव मोग्रा माता मंदिर (देदीयापाडा) आणि वलिनाथ मंदिर ( वाव) या मंदिरांना भेट दिली. ही मंदिर ज्या मतदारसंघांमध्ये आहेत तिथे काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले. राहुल गांधींच्या ''टेम्पल रन''मध्ये काँग्रेसने आता ज्या 18 जागा जिंकल्या आहेत त्यातील 10 जागा 2012 मध्ये भाजपाने जिंकल्या होत्या