गुजरात निवडणूक - 'निर्णय घ्या अन्यथा रस्त्यावर उतरु', पाटीदार नेत्यांचा काँग्रेसला 24 तासांचा अल्टिमेटम
By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2017 08:27 AM2017-11-18T08:27:14+5:302017-11-18T08:31:11+5:30
काँग्रेस नेत्यांकडून दुर्लक्षित केलं गेल्यामुळे नाराज झालेल्या पाटीदार नेत्यांनी काँग्रेसला 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे
अहमदाबाद - पाटीदारांना आरक्षण देणा-या प्रस्तावित फॉर्म्यूल्यावर चर्चा करण्यासाठी हार्दिक पटेलच्या नेतृत्वातील पाटीदार अनामत आंदोलन समिती (PAAS) आणि काँग्रेसदरम्यान शुक्रवारी दिल्लीत एक महत्वाची बैठक पार पडणार होती. मात्र काँग्रेस नेत्यांकडून दुर्लक्षित केलं गेल्यामुळे नाराज झालेल्या पाटीदार नेत्यांनी काँग्रेसला 24 तासांचा अल्टिमेटम दिला आहे. जर 24 तासांत तुम्ही तुमची भूमिका स्पष्ट केली नाही तर आम्ही तुमच्याविरोधात रस्त्यावर उतरु अशी चेतावणी पाटीदार नेत्यांनी दिली आहे.
पाटीदार अनामत आंदोलन समितीने धमकी दिली आहे की, जर काँग्रेस निर्णायक फॉर्म्यूला ठरवण्यात अयशस्वी ठरली तर आपण विरोध करत रस्त्यावर उतरु. काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत सहा जागा देण्याचं आश्वासन पाटीदार अनामत आंदोलन समितीला दिलं आहे. दुसरीकडे काँग्रेसने पक्षात सामील झालेल्या ओबीसी नेता अल्पेश ठाकोरला 12 जागा देण्याचं आश्वासन दिलं आहे.
पाटीदार अनामत आंदोलन समितीचे सदस्य दिनेश बम्भाणिया बोलले आहेत की, 'काँग्रेस नेत्यांनी आम्हाला आरक्षणावर चर्चा करण्यासाठी दिल्लीला बोलावलं होतं. आम्ही तासनतास वाट पाहत बसलो होतो, पण त्यांनी आमच्याशी कोणतीही चर्चा केली नाही. इतकंच नाही तर गुजरातचे काँग्रेस अध्यक्ष भारतसिंह सोलंकी यांनी तर आमचा फोनही उचलला नाही. पाटीदार काँग्रेसकडून धोका पत्करु शकत नाही'.
दिनेश बम्भाणिया यांनी काँग्रेसला चेतावणी देत सांगितलं आहे की, 'जर त्यांनी 24 तासांत आपली भूमिका स्पष्ट केली नाही तर आम्ही त्यांच्याविरोधात निदर्शन करण्यास सुरुवात करु. आम्ही काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेल्या पाटीदारांचाही विरोध करु'. हार्दिकचे निकटवर्तीय असणारे दिनेश बम्भाणिया यांच्या नेतृत्तावाखाली पाटीदार अनामत आंदोलन समितीच्या कोअर कमिटीची शुक्रवारी दिल्लीत भरतसिंह सोलंकी आणि गुजरात काँग्रेसचे प्रभारी अशोक गहलोत यांच्यासोबत बैठक पार पडणार होती.
गुजरात काँग्रेसचे प्रवक्ता मनीष दोषी यांनी स्पष्टीकरण देताना सांगितलं की, 'पाटीदार अनामत आंदोलन समितीसोबत कम्युनेशन गॅप झाला होता. आमचे नेते दुस-या बैठकीत व्यस्त असल्या कारणाने भेट होऊ शकलेली नाही. सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी बैठक होऊ शकते'.