Gujarat Elections: केजरीवालांनी अचानक हिमाचलमध्ये प्रचार का थांबवला? अशोक गेहलोत म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2022 01:49 PM2022-11-21T13:49:47+5:302022-11-21T13:50:07+5:30
Gujarat Elections: भाजपचा पराभव होत आहे, म्हणूनच मोदी-शहा यांनी गुजरातचे दौरे वाढवले.
Gujarat Assembly Election 2022: राजस्थानचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी सोमवारी आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल (Arvind Kejariwal) यांच्यावर निशाणा साधला. केजरीवाल यांनी हिमाचलमध्ये अचानक प्रचार का थांबवला, त्यांचा भाजपशी काही संबंध आहे का? असा सवाल त्यांनी केला. तसेच, अरविंद केजरीवाल यांची विश्वासार्हता कमी झाल्याचे गेहलोत म्हणाले.
भाजपवरही टीका
भाजपवर निशाणा साधत गेहलोत म्हणतात की, यूपी निवडणुकीपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचे गुजरात दौरे वाढले आहेत. भाजपचा पराभव होत आहे, असे त्यांना वाटते, त्यामुळेच त्यांच्या दौऱ्यांची संख्या वाढली. पंतप्रधानांची उंची खूप मोठी आहे, त्यांना येण्याची काय गरज आहे. यावरून भाजपची अवस्था खूपच कमकुवत असल्याचे दिसून येते, अशी टीक त्यांनी केली.
'राहुल गांधींचा दौरा देशासाठी आहे'
गेहलोत पुढे म्हणाले, 'राहुल गांधी प्रवास करत आहेत आणि हा प्रवास गुजरातसह देशातील प्रत्येक राज्यात होणार आहे. ते देशाचे प्रश्न मांडत आहेत. आता राहुल गांधी गुजरातमध्ये येतील आणि इथले प्रश्न मांडतील. त्यांची ही यात्रा भारतासाठी आहे, अशीही टीका गेहलोत यांनी केली.