मुंबई: गुजरात विधानसभा निवडणूक निकालाबाबत प्रसिद्ध निवडणूक विश्लेषक आणि स्वराज इंडिया पार्टीचे अध्यक्ष योगेंद्र यादव यांनी दुस-या टप्प्यातील निवडणुकीच्या एक दिवस आधी स्वतःचा ओपिनियन पोल जाहीर केला आहे.
योगेंद्र यादव यांनी गुजरात निवडणुकांबाबत तीन शक्यता वर्तवल्या आहेत. यामध्ये त्यांनी थेट भाजपाच्या पराभवाचं भाकीत वर्तवलं आहे. कॉंग्रेसला 95 ते 113 जागा मिळतील असा अंदाज त्यांनी वर्तवला आहे. यापेक्षाही मोठा पराभवाचा सामना भाजपाला करावा लागू शकतो असं त्यांनी म्हटलं आहे. एबीपी न्यूज आणि सीएसडीएस यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या ओपिनियन पोलद्वारे आपला अंदाज वर्तवला आहे.
योगेंद्र यादव यांनी पहिली शक्यता वर्तवताना भाजपा आणि कॉंग्रेस दोन्ही पक्षांना 43 टक्के जागा मिळतील अशी शक्यता वर्तवली आहे. पण जागांच्या बाबतीत भाजपाला 86 जागा तर कॉंग्रेसला 95 जागा मिळतील असं म्हटलं आहे. योगेंद्र यादव यांनी दुसरी शक्यता वर्तवताना भाजपाला 41 टक्के मतं आणि 65 जागा व काँग्रेसला 45 टक्के मतं आणि 113 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर तिस-या शक्यतेत भाजपाचा या पेक्षाही दारुण पराभव होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे.