भाजपाने दिल्ली महापालिकेतील सत्ता गमावल्याचे दिसत असताना भाजपासाठी गुजरातमधून गुड न्यूज येत आहे. गुजरातमध्ये आपच्या अरविंद केजरीवालांनी नुसतीच हवा केल्याचे दिसत असून त्यांचा फुगा फुटल्याचेही एक्झिट पोलमध्ये समोर येत आहे.
न्यूज एक्स, जन की बात आणि टीव्ही९ यांनी जाहीर केलेल्या एक्झिट पोलनुसार गुजरातमध्ये भाजपाचीच सत्ता कायम राहणार असल्याचे दिसत आहे. न्यूज एक्सनुसार भाजपाला १८२ पैकू ११७ ते १४० जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसला ३४ ते ५१ जागा आणि हवा करणाऱ्या आपला ६ ते १३ जागा मिळताना दिसत आहेत. इतरांना १ ते २ जागा मिळण्याची शक्यता आहे.
टीव्ही९ च्या एक्झिट पोलनुसार भाजपाला 125-130, काँग्रेसला 40-50, आपला 03-05 आणि इतरांना 03-07 जागा मिळताना दिसत आहेत. गुजरातमध्ये सत्तास्थापनेसाठी ९२ जागांची आवश्यता आहे. यात भाजपा आरामात सत्ता राखताना दिसत आहे. P-MARQ च्या एक्झिट पोलनुसार भाजपाला 128-148, काँग्रेसला 30-42, आपला 2-10 आणि इतरांना ० जागा मिळताना दिसत आहे.
गुजरात विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (आप) सत्ताधारी भाजपाचा प्रमुख प्रतिस्पर्धी म्हणून स्वतःला समोर आणण्याचा प्रयत्न केला होता. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत आपच्या सर्व 29 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते. परंतू आता आपला काही आमदार निवडून येताना दिसत आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 99 तर काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या. याचाच अर्थ आपने भाजपाची नाही तर काँग्रेसची मते कापली आहेत. यामुळे अनेक जागांवर काँग्रेस आणि आपमध्ये मतांचे विभाजन झाल्याचे दिसण्याची शक्यता आहे.