गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळाला. अनेक शहरांमध्ये पाणी साचलं आहे. पाणी साचल्याने नागरिकांना घराबाहेर पडणं कठीण झालं. जुनागडसह अनेक भागात एनडीआरएफच्या पथकांना पाचारण करण्यात आले असून बचावकार्य सुरू आहे. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ समोर येत आहेत, ज्यामध्ये रस्त्यावर पार्क केलेली वाहनेही पाण्यात बुडाल्याचे पाहायला मिळत आहे. असाच एक व्हिडीओ नवसारीतून समोर आला आहे. पाण्यात 50 हून अधिक सिलिंडर तरंगत असल्याचं पाहायला मिळत आहे.
छतापर्यंत पाणी गेल्याने हे सिलिंडर पाण्यात तरंगू लागले आहेत. हा व्हिडीओ पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित झाला असून काही अनुचित प्रकार घडण्याची भीतीही लोकांना वाटत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नवसारीत अवघ्या 4 तासांत 13 सेंटीमीटर पाऊस झाल्याने परिस्थिती बिकट झाली आहे. सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरले आहे. अनेक ठिकाणी तर वाहने आणि जनावरे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. हवामान खात्याने भावनगर, नवसारी, वलसाड आणि जुनागडसाठी अलर्ट जारी केला आहे.
जुनागडमध्ये बुधवारपासून सतत पाऊस पडत असून, त्यामुळे बहुतांश भागात पाणी साचले आहे. एका घराच्या छतावर अनेक रिकामे आणि भरलेले सिलिंडर ठेवलेले असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. पुराचे पाणी त्या छतावरही दिसते. त्यामुळे रिकामे सिलिंडर पाण्यात तरंगू लागतात. हे सिलिंडर गेटमधून बाहेर पडतात आणि रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्यात जातात. मोठ्या संख्येने गॅस सिलिंडर अशा प्रकारे वाहत असल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे.
गुजरातमधील सोमनाथ, जुनागड, राजकोट आणि नवसारी या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. अनेक शहरांमध्ये पूरस्थिती दिसते. एनडीआरएफ, एसडीआरएफ, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांचे पथक सखल भागातील लोकांना वाचवत आहेत आणि त्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवत आहेत. आतापर्यंत अनेक वाहनं पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची माहिती आहे. याशिवाय जोरदार प्रवाहात अनेक प्राणीही वाहून गेले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.