अहमदाबाद :गुजरातचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसमधील वरिष्ठ नेते माधव सिंह सोलंकी यांचे निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते. सोलंकी यांनी तब्बल चार वेळा गुजरातचे मुख्यमंत्रीपद भूषवले होते. केंद्रीय राजकारणातही त्यांनी आपला ठसा उमटवला होते. भारताचे परराष्ट्रमंत्री म्हणूनही त्यांनी कामकाज पाहिले होते.
माधव सिंह सोलंकी यांना KHAM थेअरीचे जनक मानले जाते. राजकारण आणि जातीयवादी समीकरणाचा प्रयोग करत प्रचंड बहुमताने सत्ता स्थापन करण्यात सोलंकी यांना यश मिळाले होते, असे सांगितले जाते. माधव सिंह सोलंकी नावाजलेले वकील होते. १९७७ मध्ये ते पहिल्यांदा मुख्यमंत्री बनले. १९८० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला घवघवीत यश मिळाले. यात सोलंकी यांचा मोठा वाटा होता, असेही म्हटले जाते.
पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत माधव सिंह सोलंकी यांच्या निधनाबाबत शोक व्यक्त केला आहे. माधव सिंह सोलंकी हे मोठे नेते होते. गुजरातच्या राजकारणात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. समाजासाठी दिलेल्या समृद्ध योगदान आणि सेवेसाठी माधव सिंह सोलंकी नेहमी लक्षात राहतील, असे ट्विट पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी केले.
माधव सिंह सोलंकी यांना अभ्यासाची प्रचंड आवड होती. आमची भेट व्हायची, तेव्हा नेहमीच वेगवेगळ्या पुस्तकांविषयी चर्चा होत असे, असेही पंतप्रधान मोदी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माधव सिंह सोलंकी यांचे पुत्र यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधत आपला शोक प्रकट केला.