गांधीनगर - आगामी गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या गुजरात गौरव यात्रा समापन संमेलनाला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संबोधित करणार आहेत. या संमेलनासाठी जवळपास 7 लाख कार्यकर्ते एकत्र येणार असल्याचा दावा भाजपानं केला आहे. यापूर्वी अशा पद्धतीनं कोणत्याही पक्षाच्या मेळाव्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते एकत्र जमलेले नाहीत, त्यामुळे हा मेळावा ऐतिहासिक होणार असल्याचे भाजपाचं म्हणणं आहे. भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी भट गावात गुजरात गौरव महासंमेलनात जवळपास सात लाख भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
यादरम्यान गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह आणि अन्य नेतेमंडळीदेखील उपस्थित असणार आहेत. गेल्या आठवड्यात मोदी यांनी राजकोट, वडनगर, गांधीनगरसारख्या परिसरात अनेक योजनांचे भूमिपूजन केले तर काही योजनांचा शुभारंभदेखील केला.
गुजरातचे भाजपाचे अध्यक्ष जीतू वघानी यांनी गुजरातमध्ये होणारे हे महासंमेलन ऐतिहासिक होणार असल्याचा दावा करत म्हटले की, 15 दिवसांच्या या यात्रेला शानदार प्रतिसाद मिळाला. या पार्श्वभूमीवर संमेलनाच्या ठिकाणी पक्षानं जवळपास 10 लाख लोकांसाठी व्यवस्था करुन ठेवली आहे.
याआधी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत सांगितले की, दशकांपासून भाजपाला आशीर्वाद देण्यासाठी गुजरातच्या नागरिकांपुढे मी नतमस्तक आहे. आम्ही पूर्ण शक्ती आणि पुरुषार्थानं नेहमी प्रत्येक गुजरातींचं स्वप्न पूर्ण करू. दरम्यान, मोदी यांनी अन्य एका ट्विटमध्ये असेही लिहिले आहे की, दोन गुजरात गौरव यात्रांमुळे जनशक्तीचा जोश समोर आला आणि यादरम्यान गुजरातचा झालेला मजबूत विकासदेखील झळकला.