गुजरातहून अयोध्येला तीर्थ यात्रेसाठी जाणाऱ्या आदिवासींना ५० हजारांची आर्थिक मदत केली जाणार असल्याची घोषणा गुजरात सरकारनं (Gujarat Government) केली आहे. राज्याचे पर्यटन मंत्री पूर्णेश मोदी यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे. अयोध्येतील राम जन्मभूमी तीर्थ यात्रेला जाणाऱ्या गुजरातमधील आदिवासींना प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. अशा पद्धतीनं एकूण ५० हजारांची आर्थिक मदत घोषित करण्यात आली आहे. "आदिवासी लोक शबरी मातेचे वंशज आहेत. भगवान राम यांची १४ वर्षांच्या वनवासावेळी शबरी मातेशी भेट झाली होती. आता त्यांच्या वंशजांना अयोध्येच्या तीर्थ यात्रेसाठी आर्थिक मदत सरकारकडून केली जाणार आहे", असं पूर्णेश मोदी म्हणाले.
गुजरातमधील आदिवासी बहुल डांग जिल्ह्यात आज पुर्णेश मोदी यांनी याबाबतची घोषणा केली. सुबीर गावातील शबरी धाम येथे उपस्थितांना ते संबोधित करत होते. आदिवासींच्या अयोध्या तीर्थ यात्रेसाठी सरकार ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर करत आहे, अशी घोषणा पूर्णेश यांनी केली. ही मदत कैलाश मानसरोवर यात्रा, सिंधु दर्शन आणि श्रवण तीर्थ यात्रेसाठी केल्या जाणाऱ्या मदती इतकीच आहे असंही ते म्हणाले.
अयोध्या दर्शनासाठी मिळणार ५० हजार रुपये!गुजरातच्या डांग जिल्ह्यापासून ते नर्मदा जिल्ह्यातील स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत एक पर्यटन सर्किट करण्यासाठी राज्य सरकारनं नव्या योजनेला सुरुवात केली आहे. अयोध्येत भगवान राम यांचं भव्य मंदिर उभारलं जात आहे. भगवान श्री राम हिंदुंचं श्रद्धास्थान आहे. याआधीही अनेक भक्त अयोध्या दर्शनासाठी जात होते. पण त्यावेळी राम मंदिर प्रकरण कोर्टात असल्यानं अनेक बंधन होती. श्री राम तेव्हा एका छताखाली विराजमान होते. पण आता त्यांचं भव्य मंदिर उभारलं जातंय. अयोध्येचा एक पर्यटन स्थळ म्हणून विकास केला जात आहे. मंदिराचं काम पूर्ण झाल्यानंतर देश-विदेशातून अनेक भक्त भगवान श्री रामाच्या दर्शनासाठी अयोध्येत येतील, असा विश्वास पूर्णेश यांनी व्यक्त केला. यात गुजरातमधील आदिवासींसाठी भगवान श्री रामाचं दर्शन घेणं आता अधिक सोपं होणार आहे. कारण अयोध्या यात्रेसाठी येणारा खर्च गुजरात सरकार करणार आहे. सरकार अयोध्या तीर्थ यात्रेसाठी जाणाऱ्यांना ५० हजारापर्यंत आर्थिक मदत करणार आहे.