गुजरातच्या कायदा मंत्र्यांची आमदारकीच रद्द; मतमोजणीत फेरफार केल्याचा ठपका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 16:17 IST2020-05-12T16:15:34+5:302020-05-12T16:17:41+5:30
विधानसभा निवडणुकीमध्ये चुडासमा यांनी चुकीच्या पद्धतीने निवडणूक जिंकल्याचा आरोप राठोड यांनी केला होता.

गुजरातच्या कायदा मंत्र्यांची आमदारकीच रद्द; मतमोजणीत फेरफार केल्याचा ठपका
अहमदाबाद : गुजरातचे कायदे मंत्री भूमेंद्रसिंह चुडासमा यांना उच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे. गुजरातच्याउच्च न्यायालयाने २०१७ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत धोलकामधून चुडासमा यांचा विजय बेकायदेशीर असल्याचा निर्णय दिला आहे. त्यांचे विरोधक उमेदवार अश्विन राठोड यांनी उच्च न्यायालय़ात आव्हान दिले होते.
विधानसभा निवडणुकीमध्ये चुडासमा यांनी चुकीच्या पद्धतीने निवडणूक जिंकल्याचा आरोप राठोड यांनी केला होता. मतमोजणी सुरु असताना बॅलेट पेपरच्या मोजणीवेळी फेरफार करण्यात आला. या प्रकरणी दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर तेथील निवडणूक अधिकारी धवल जॉनी यांची बदली उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे करण्यात आली होती. मंत्री चुडासमा यांनी या जागेवर केवळ ३२७ मतांनी विजय मिळविला होता.
यावर गुजरातच्या रुपानी सरकारमध्ये कायदे मंत्री असलेल्या चुडासमा यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे. तर उप मुख्यमंत्री नितीन पटेल यांनी सांगितले की, आम्ही कायदेशीररित्या आव्हान देणार आहोत. तसेच प्रदेशाध्य़क्ष, मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय नेत्यांसोबत चर्चा केली जाणार आहे.
काय प्रकरण होते?
मतमोजणी करतेवेळी पोस्टल मतांची मोजणी करताना मोठी गडबड करण्यात आली. निवडणूक अधिकाऱ्याने ४२९ पोस्टल मते रद्द केली. याचा फटका राठोड यांना बसला आणि चुडासमा यांना विजयी घोषित करण्यात आले होते.