पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हिराबेन यांचे आज निधन झाले. हीराबेन यांना अहमदाबाद येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारावेळी त्यांचे निधन झाले. मोदी यांनी गांधीनगरमध्ये हीराबेन यांच्या पार्थिवाला खांदा दिला. यानंतर स्मशानभूमीत मुखाग्नी देत अंत्यसंस्कार केले. हीराबेन यांनी पहाटे साडेतीन वाजता अखेरचा श्वास घेतला. १८ जून रोजी हीराबेन यांनी १०० व्या वर्षात पदार्पण केले होते.
गुरुवारी मध्यरात्री अचानक हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावली. डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, उपचारादरम्यान हीराबने यांची प्राणज्योत मालवली. हीराबेन यांच्या निधनावर सामाजिक तसेच राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे. हीराबेन मोदी यांच्या मागे पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे.
हीराबेन यांचा जन्म १८ जून १९२३ मध्ये झाला होता. या वर्षी त्यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यानिमित्ताने त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. आईच्या वाढदिवसासाठी स्वत: नरेंद्र मोदी गुजरातच्या गांधीनगरला आले होते. त्यांनी आईचे पाय धुवून आशीर्वादही घेतले होते.