बिन फेरे हम तेरे! 20 वर्षांच्या तरुणीला 19 वर्षांच्या बॉयफ्रेंडसोबत राहण्याची परवानगी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 05:18 PM2018-08-03T17:18:16+5:302018-08-03T17:22:42+5:30
गुजरात उच्च न्यायालयाकडून प्रेमी युगुलाला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्याची परवानगी
अहमदाबाद : गुजरात उच्च न्यायालयानं एका 20 वर्षाच्या तरुणीला तिच्या 19 वर्षांच्या प्रियकरासोबत राहण्याची परवानगी दिली आहे. या प्रकरणात प्रियकर 19 वर्षांचा असल्यानं तो सज्ञान नाही. त्यामुळे आता दोघांचं लग्न होऊ शकत नाही. मात्र तरुणी सज्ञान असल्यानं तिला ज्या व्यक्तीसोबत राहायचं आहे, त्या व्यक्तीसोबत राहण्याचा अधिकार तरुणीला आहे, असं उच्च न्यायालयानं म्हटलं. या तरुणीनं तिच्या आईसोबत राहण्यास ठाम नकार दिला आहे.
तरुणीला ज्या ठिकाणी राहायचं आहे, त्या ठिकाणी तिला नेण्याची जबाबदारी पोलिसांची असेल, असं राज्य सरकारनं न्यायालयाला सांगितलं. तरुणीच्या प्रियकरानं न्यायालयात लिव्ह-इन-रिलेशनशिपसाठी अर्ज केला होता. प्रेयसीला तिचे कुटुंबीय आपल्यापासून जबरदस्तीनं दूर ठेवत आहेत. त्यामुळे तिला न्यायालयासमोर हजर राहण्याचे आदेश दिले जावेत, अशी विनंती प्रियकरानं केली होती. आपण अद्याप सज्ञान नसल्यानं लग्न करु शकत नाही. त्यामुळे आम्हाला लिव्ह-इनमध्ये राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती त्यानं न्यायालयाकडे केली होती.
प्रियकर आणि प्रेयसी वेगवेगळ्या समुदायाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांचा या नात्यासा विरोध आहे. या दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र मुलीच्या कुटुंबीयांनी दोघांना शोधून काढलं. त्यानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी तिला जबरदस्तीनं मुलापासून दूर ठेवलं. मात्र न्यायालयानं या दोघांच्या बाजूनं कौल दिला. त्यामुळे त्यांना लिव्ह-इनमध्ये राहण्याची परवानगी मिळाली आहे.