Gujarat High Court: 'मनुस्मृती वाचा, मुली वयाच्या 17 व्या वर्षी बाळाला जन्म देत होत्या'; गुजरात उच्च न्यायालयानं का केलं असं भाष्य? जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2023 10:00 AM2023-06-09T10:00:44+5:302023-06-09T10:02:21+5:30
या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जूनला ठेवण्यात आली आहे...
'पूर्वी वयाच्या 14 व्या 15 व्या वर्षी लग्न आणि 17 व्या वर्षी आई होणे ही सामान्य गोष्ट होती.' असे भाष्य गुजरात उच्च न्यायालयाने एका 17 वर्षांच्या मुलीचा सात महिन्यांचा गर्भ नष्ट करण्याच्या याचिकेवर केले आहे. गुजरात उच्च न्यायालयाने मनुस्मृतीचा दाखला देत ही मौखिक टिप्पणी केली. लाइव्ह लॉ वेबसाइटनुसार, गुजरात उच्च न्यायालयात एका अल्पवयीन बलात्कार पीडितेच्या याचिकेवर सुनावणी झाली.
यावेळी गुजरात उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती समीर जे दवे तोंडी टिप्पणी करताना म्हणाले, 'आपण 21 व्या शतकात आहोत, आपल्या आई अथवा आजींना विचारा, 14-15 वर्ष हे लग्णाचे वय होते. मूल 17 वर्षांच्या आतच जन्माला यायचं. मुली मुलांच्या तुलनेत लवकर मॅच्योर होतात. आपण हे वाचणार नाही. मात्र यासाठी एकदा मनुस्मृती वाचा.'
गर्भ 7 महिन्यांपेक्षा मोठा - उच्च न्यायालय
बलात्कार पीडितेच्या वडिलांच्या वकिलाने या प्रकरणी मुलीचे कमी वय पाहता, गर्भपातासंदर्भात भाष्य केले होते. यावर गुजरात उच्चन्यायालयाने वरील भाष्य केले आहे. मात्र, गर्भपात केला जाऊ शकतो का? यासंदर्भात आपण डॉक्टरांचाही सल्ला घेतला होता, कारण गर्भ सात महिन्यांहून अधिकचा आहे. असेही उच्च न्यायालयाने यावेळी म्हटले आहे.
याच वेळी, जर अल्पवयीन आणि भ्रूण दोहोंनाही धोका असेल, तर न्यायालय गर्भपाताची परवानगी देऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायलयाने अल्पवयीन मुलीची वैद्यकीय तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. यासंदर्भात गुजरात उच्च न्यायालय डॉक्टरांचा अहवाल आल्यानंतरच निर्णय घेईल. या प्रकरणाची पुढील सुनावणी 15 जूनला ठेवण्यात आली आहे.