नवी दिल्ली: गुजरात उच्च न्यायालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या पक्षाचे खासदार संजय सिंह यांच्याविरुद्ध गुजरात विद्यापीठाविरुद्ध केलेल्या अवमानकारक वक्तव्याबद्दल सुरू केलेल्या मानहानीच्या कारवाईला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पदवीच्या वादात मानहानीच्या खटल्याचा सामना करत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून मोठा दणका बसला आहे.
कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास गुजरात उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. मानहानीच्या प्रकरणात, अरविंद केजरीवाल आणि संजय सिंह यांनी गुजरात उच्च न्यायालयात कनिष्ठ न्यायालयाच्या समन्स आदेश आणि खटल्यातील चालू कार्यवाही स्थगित करण्याच्या विरोधात याचिका दाखल केली होती.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह हे शुक्रवारी, ११ ऑगस्ट रोजी गुजरातमधील अहमदाबादच्या खालच्या न्यायालयात मानहानीच्या खटल्यात हजर होणार होते. या प्रकरणात अंतरिम दिलासा मिळावा यासाठी दोन्ही नेत्यांनी गुजरात उच्च न्यायालयात दाद मागितली होती.