राहुल गांधींना मोठा धक्का, हायकोर्टानं याचिका फेटाळली, 2 वर्षांची शिक्षा कायम!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2023 12:01 PM2023-07-07T12:01:58+5:302023-07-07T12:02:26+5:30
गुजरात हायकोर्टाने राहुल गांधी यांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे.
अहमदाबाद : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी मोदी आडनावाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात मानहानीचा खटला सुरू आहे. सुरत कोर्टाने राहुल गांधी यांना दोषी ठरवून 23 मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. याविरोधात राहुल गांधी यांनी गुजरात हायकोर्टात धाव घेत पुनर्विचार याचिका दाखल घेतली होती. यावर शुक्रवारी गुजरात हायकोर्टात सुनावणी झाली. यावेळी गुजरात हायकोर्टाने राहुल गांधी यांची पुनर्विचार याचिका फेटाळली आहे.
दरम्यान, गुजरात हायकोर्टाने राहुल गांधींना कोणाताही दिलासा दिलेला नाही. गुजरात हायकोर्टाने राहुल गांधी यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे राहुल गांधी यांची 2 वर्षांची शिक्षा कायम राहणार आहे. या निर्णयामुळे राहुल गांधींची खासदारकी रद्दच राहणार आहे. त्यामुळे राहुल गांधींसाठी हा एक मोठा धक्का मानला जात आहे. गुजरात हायकोर्टाने म्हटले आहे की, सुरत कोर्टाचा दोषी ठरवण्याचा आदेश योग्य आहे, या आदेशात हस्तक्षेप करण्याची गरज नाही, त्यामुळे अर्ज फेटाळला जातो. तसेच, राहुल गांधी यांच्यावरील जवळपास 10 गुन्हेगारी खटले प्रलंबित आहेत, असेही गुजरात कोर्टाने म्हटले आहे.
काय आहे प्रकरण?
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केलेल्या भाषणात "मोदी हे सर्व चोरांचे आडनाव आहे" असे म्हटल्याबद्दल भाजप नेते पूर्णेश मोदी यांनी सुरतच्या कोर्टात राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधींनी मोदी आडनावाच्या लोकांची बदनामी केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यांनी म्हटले होते की, 'राहुल गांधींनी असे म्हणत मोदी आडनाव असलेल्या लोकांची बदनामी केली आहे.' याप्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 499 आणि 500 अंतर्गत राहुल गांधींना दोषी ठरवणाऱ्या मुख्य न्यायदंडाधिकारी एचएच वर्मा यांच्या कोर्टाने त्यांना जामीन सुद्धा मंजूर केला होता आणि हायकोर्टात अपील करण्याची मुभा देण्यासाठी 30 दिवसांची शिक्षा स्थगित केली होती.