गुजरातमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये पुन्हा एकदा वाढ होत असल्याने काही निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहेत. त्यात मास्क वापरणं बंधनकारक असलं तरी काही जण बेफिकीरीने वागत असल्याचं दिसून येतं आहे. काही जण मास्क न लावल्याचा दंड भरुनही मास्क वापरत नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे गुजरातच्या हायकोर्टाने आता नामी शक्कल शोधून काढली आहे.
मास्क न वापरणाऱ्यांवर केवळ दंड आकारणं पुरेसं नाही. त्यांना आता कोरोना सेंटरमध्ये दिवसाचे ५ ते ६ तास सेवा करण्याची शिक्षा द्यायला हवी आणि या शिक्षेचा कालावधी ५ दिवसांपासून ते १५ दिवसांपर्यंत असायला हवा, असे आदेश गुजरातच्या हायकोर्टाने दिला आहे. मास्क न वापरणाऱ्यांना कोरोना सेंटरमध्ये किती दिवस सेवा देण्याची शिक्षा द्यायची हे त्या व्यक्तीचं वय आणि आरोग्याच्या माहितीवरुन निश्चित केलं जावं, असंही हायकोर्टाने सुचवलं आहे.
गुजरातमध्ये कोरोनाच्या दुसरी लाट असूनही काही लोक मास्क वापरत नसल्याचं समोर आलं आहे. अशा लोकांना कोरोना सेंटरमध्ये सेवा देण्याचा निकाल हायकोर्टाने दिला आणि राज्य शासनालाही त्यासंदर्भातील आदेश जारी करण्यास सांगितलं आहे. मुख्य न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे.
मास्क न वापरणाऱ्यांवर केवळ दंड आकारणं आता पुरेसं नाही. मास्क न वापरणाऱ्यांकडून कोरोना सेंटरमध्ये सेवा करवून घेण्यासाठी सरकारने एखाद्या संस्थेला जबाबदारी द्यावी, असं मत न्यायाधीश विक्रम नाथ यांच्या खंडपीठाने व्यक्त केलं आहे. नियमांचा भंग करणाऱ्यांना कमीत कमी पाच ते जास्तीत जास्त १५ दिवसांसाठी कोणत्याही कोरोना सेंटरमध्ये सेवा बजावण्याची शिक्षा करण्यात यावी. दिवसांतून चार ते पाच तास त्यांच्याकडून काम करून घेण्यात यावं, असंही हायकोर्टाने आदेशात म्हटलं आहे.