दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काही दिवसांतच आम आदमी पक्ष आणि अरविंद केजरीवाल यांच्यासाठी खूशखबर आली आहे. आम आदमी पक्षाने नरेंद्र मोदींचं गृहराज्य असलेल्या गुजरातमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली आहे. गुजरातमध्येआपचा जनाधार वाढला असून, राज्यातील काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जागा जिंकून आपलं अस्तित्व निर्माण केलं आहे. त्यामुळे दिल्लीतील पराभवानंतर आम आदमी पक्षाला मोठा दिलासा मिळाला आहे.
गुजरातमधील पालिका निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाने सुमारे २० हून अधिक जागा जिंकल्या आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे गुजरातमध्ये भाजपाचं प्रभावक्षेत्र असलेल्या अनेक भागात आपने जागा जिंकण्यात यश मिळवलं आहे. आम आदमी पक्षाने आपच्या उमेदवारांचा झालेला विजय हा आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या आदर्शांचा विजय असल्याची प्रतिक्रिया आपच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहे. तर आपचे गुजरातमधील कार्यकर्ते हा हुकूमशाहीचा पराभव आणि सत्याचा विजय असल्याचे सांगत आहेत.
गुजगातमधील द्वारकेमध्ये आपने अनेक जागा जिंकल्या आहेत. त्याशिवाय जुनागडच्या मांगरोल नगरपालिकेमधील प्रभाग क्रमांक ३ मध्ये आपचा विजय झाला आहे. येथे आपचे चारही उमेदवार विजयी झाले आहेत. करजण नगरपालिकेत पाच जागांवर आपचा विजय झाला आहे. बडोदा जिल्ह्यातही आपने जोरदार मुसंडी मारली आहे. येथे पक्षाने चार जागा जिंकल्या आहेत. जामनगरमध्ये भाजपाने २८ पैकी २७ जागांवर विजय मिळवला आहे. तर एका जागेवर आपचा विजय झाला आहे.