Gujarat Lok Sabha Election 2024: देशात सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. पहिल्या दोन टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली असून तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ मे रोजी होणार आहे. गुजरातमधील सर्व २६ (सूरतमधील बिनविरोध जागा वगळता) जागांसाठी ७ तारखेला मतदान होणार आहे. २६६ उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहेत. भाजपच्या पूनमबेम माडम ह्या गुजरातमधील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत, त्यांची एकूण संपत्ती १४७ कोटी एवढी आहे. एडीआरने (असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मस) ही माहिती दिली.
तसेच मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीच्या उमेदवार रेखा चौधरी यांची केवळ २ हजार रूपये एवढी संपत्ती आहे. रेखा ह्या बारडोलीतून निवडणूक लढवत आहेत. ही जागा अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे. खरे तर गुजरातमधील एकूण २६६ उमेदवारांपैकी ६८ उमेदवार हे कोट्यधीश आहेत. अलीकडेच सूरतमधून बिनविरोध निवडणूक जिंकलेले भाजपचे मुकेश दलाल यांची संपत्ती १७ कोटी रुपये आहे.
श्रीमंत उमेदवार...सर्वात श्रीमंत उमेदवार पूनमबेम माडम ह्या जामनगरमधून निवडणूक लढवत आहेत. त्या येथून विद्यमान खासदार देखील असून भाजपने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी आपली संपत्ती ४२.७ कोटी रुपये असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्याकडे ६० कोटी रुपयांची जंगम आणि ८७ कोटी रुपयांची स्थावर मालमत्ता आहे.
दरम्यान, गुजरात लोकसभा निवडणुकीत भाजपचे एकूण २४ उमेदवार कोट्यवधी रूपयांचे मालक आहेत, तर काँग्रेसचे २१ उमेदवार करोडपती आहेत. तर बहुजन समाज पार्टीचे चार उमेदवारही करोडपती आहेत. भाजपच्या उमेदवारांची सरासरी मालमत्ता १५ कोटी रुपये, तर काँग्रेसच्या उमेदवारांची सरासरी मालमत्ता ६ कोटी रुपये आहे. १५ श्रीमंत उमेदवारांपैकी ८ भाजपचे आणि ७ काँग्रेसचे आहेत.