नवी दिल्ली - गुजरातमधील एकूण 33 जिल्ह्यांपैकी 17 जिल्ह्यांमध्ये 'लंपी' त्वचारोगामुळे आतापर्यंत 1200 हून अधिक जनावरांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी दिलेल्या माहितीनुसार, रोगाचा प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने सर्वेक्षण, उपचार आणि लसीकरणाची गती वाढवली आहे. तसेच पशु मेळावे घेण्यावरही बंदी घातली आहे. राज्याचे कृषी आणि पशुसंवर्धन मंत्री राघवजी पटेल यांनी सांगितले की, या संसर्गजन्य आजारामुळे शनिवारपर्यंत 1,240 गुरांचा मृत्यू झाला आहे. ते म्हणाले की, 5.74 लाख जनावरांचे या आजारावर लसीकरण करण्यात आले आहे.
"हा संसर्गजन्य आजार राज्यातील 33 पैकी 17 जिल्ह्यांमध्ये पसरला असून त्यापैकी बहुतेक सौराष्ट्र प्रदेशात आहेत" असंही म्हटलं आहे. पटेल म्हणाले की, बाधित जिल्ह्यात कच्छ, जामनगर, देवभूमी द्वारका, राजकोट, पोरबंदर, मोरबी, जुनागढ, गीरमध्ये सोमनाथ, बनासकांठा, पाटण, सुरत, सुरेंद्रनगर, भावनगर अरवली आणि पंचमहाल यांचा समावेश आहे. या रोगाचा प्रसार रोखण्यासाठी, राज्य सरकारने 26 जुलै रोजी जारी केलेल्या अधिसूचनेद्वारे, पशु मेळ्यांवर बंदी घातली आहे, असं म्हटलं आहे.
राजकोट जिल्हा प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, 21 ऑगस्टपर्यंत इतर राज्ये, जिल्हे, तालुके आणि शहरांमधून जनावरांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. मृत जनावरं उघड्यावर टाकण्यासही प्रशासनाने बंदी घातली आहे. मंत्री म्हणाले की, बाधित जिल्ह्यातील 1,746 गावांमध्ये 50,328 गुरांवर उपचार करण्यात आले आहेत. दरम्यान, या रोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांची खरी संख्या राज्य सरकार जाहीर करत नसल्याचा आरोप विरोधी पक्ष काँग्रेसने केला असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.
लंपी त्वचा रोग हा एक संसर्गजन्य रोग आहे, जो डास, माशी चावल्यानंतर किंवा थेट संपर्काने किंवा दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे पसरतो. यामुळे प्राण्यांमध्ये सर्व लक्षणांसह, त्यांचा मृत्यू देखील होऊ शकतो. जनावरांमध्ये हा रोग झपाट्याने पसरत आहे. याला 'लंपी स्किन डिसीज व्हायरस' (एलएसडीव्ही) म्हणतात. जगातील मंकीपॉक्सनंतर आता हा दुर्मिळ संसर्ग शास्त्रज्ञांसाठी चिंतेचा विषय बनला आहे. या विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी जनावरांना लसीकरण करण्यात येत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.