राहुल गांधींना विष पाजा, वाचल्यास शंकराचे अवतार, गुजरातच्या मंत्र्याचं वादग्रस्त विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2019 06:52 PM2019-03-25T18:52:59+5:302019-03-25T18:59:26+5:30
येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रंगत चढली असून, अनेक नेते वादग्रस्त विधान करत सुटले आहेत.
नवी दिल्ली- येत्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची जोरदार रंगत चढली असून, अनेक नेते वादग्रस्त विधान करत सुटले आहेत. मोदी मोदी जप करणाऱ्यांच्या कानशिलात लगावा, अशा विधानानंतर गुजरातच्या रुपाणी सरकारमध्ये मंत्री असलेल्या गणपत वसावा यांनीही वादग्रस्त विधान केलं आहे.
ते म्हणाले राहुल गांधींना विष पाजा, वाचल्यास शंकराचे अवतार समजू. सोशल मीडियावरून त्यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. रुपाणी सरकारमध्ये वने आणि पर्यावरण मंत्री असलेल्या गणपत वसावा यांनी राहुल गांधींसंदर्भात आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. वसावा यांनी सोशल मीडियावर भाजपाच्या कार्यकर्त्यांचा हवाला देत सांगितलं की, राहुल गांधींना भगवान शंकरासारखं विष दिलं पाहिजे. विष पाजल्यानंतर ते निवडणुकीपर्यंत जिवंत राहतात की नाही ते पाहू.
खरं तर वसावा यांनी राहुल गांधींची शंकराशी तुलना करणाऱ्या त्या काँग्रेसच्या नेत्यांना प्रत्युत्तर दिलं आहे. राहुल गांधी हे भगवान शंकराचे अवतार असल्याचं सोशल मीडियावरून काँग्रेसच्या एका बड्या नेत्यानं म्हटलं होतं. त्याचाच हवाला देत गणपत वसावा म्हणाले, राहुल गांधी भगवान शंकराचे अवतार आहेत. तुम्ही सेना आणि जवानांकडे पाकिस्तानच्या हल्ल्याचे पुरावे मागत आहात. तर दुसरीकडे तुम्ही राहुल गांधींना साक्षात शिवाचे अवतार असल्याचं सांगत आहात. भगवान शंकर लोकांचं दुःख दूर करण्यासाठी विष प्यायचे, तुमच्या नेत्यालाही 500 ग्राम विष पाजा, निवडणुकीपर्यंत जिवंत राहिल्यास शिवाचे अवतार समजू.
दुसरीकडे कालच कर्नाटकातील एका जनसभेला संबोधित करताना शिवालिंग गौडा म्हणाले, मोदी मोदीच्या घोषणा देणाऱ्यांच्या कानशिलात लगावा. मोदींनी जशी आश्वासनं दिली होती, तसे कोणाच्या खात्यात आतापर्यंत 15 लाख आले आहेत काय?, जो कोणी भाजपा नेता प्रचारादरम्यान तुमच्याजवळ येईल त्याला पहिला प्रश्न हा विचारा. भाजपा प्रवक्ते आणि आमदार सुरेश कुमार यांनी शिवालिंग गौडा यांच्या विधानाचा निषेध नोंदवला आहे.