मोरबी: गुजरातच्या मोरबी जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. शहरातील मणि मंदिराजवळील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला केबल ब्रिज(झुलता पूल) तुटून नदीत कोसळला. या भीषण दुर्घटनेत आतापर्यंत 60हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 100 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. घटनेवेळी पुलावर शेकडो लोक उपस्थित होते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदत जाहीर केली आहे. तसेच, राज्य सरकारने या घटनेच्या तपासासाठी SITची स्थापना केली आहे.
सविस्तर माहिती अशी की, आज सायंकाळी 7च्या सुमारास मोरबी शहरातील मच्छु नदीवर बांधण्यात आलेला पूल अचानक नदीत कोसळला. विशेष म्हणजे, गेल्या सात महिन्यांपासून या पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरू होते आणि पाच दिवसांपूर्वीच हा नागरिकांसाठी खुला करण्यात आला होता. या पुलाच्या दुरुस्तीवर 2 कोटी रुपये खर्च झाले होते. इतके रुपये खर्च करुनही पूल तुटल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची आता चौकशी होणार असल्याची माहिती गुजरात सरकारमधील मंत्री बृजेश मेरजा यांनी दिली.
सरकारची मदत जाहीर
या दुर्घटनेनंतर पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या लोकांनी बचावकार्य सुरू केले आहे. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांच्याशी फोनवर चर्चा करुन योग्य ते निर्देश दिले आहेत. पटेल यांनी या दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 4 लाख आणि जखमींना 50 हजार रुपये नुकसान भरपाईची जाहीर केली आहे. तसेच, पीएम नरेंद्र मोदी यांनी मृतांसाठी 2 लाख आणि जखमींना 50 हजार रुपये जाहीर केले आहेत.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले असून, त्यांनी गुजरातचे गृह राज्यमंत्री हर्ष संघवी यांच्यासह अधिकाऱ्यांशी याविषयी चर्चा केली आहे. त्यांनी तात्काळ मदतीचे निर्देशही दिले आहेत. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांनीही या घटनेवर दुःख व्यक्त केले आहे.
SITची स्थापना
गुजरात सरकारने या दुर्घटनेच्या चौकशीसाठी 5 जणांची एसआयटी स्थापन केली असून त्यात महापालिकेचा एक आयएएस अधिकारी, एक गुणवत्ता नियंत्रण अभियंता आणि इतर 3 अधिकारी असतील. याशिवाय सीआयडीचे पथकही या प्रकरणाची चौकशी करणार आहे. ज्यांचे कुटुंबीय अपघातानंतर अडकले आहेत किंवा बेपत्ता आहेत. त्यांच्या माहितीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती नियंत्रण कक्षाने 02822 243300 हा हेल्पलाइन क्रमांक जारी केला आहे.
मोरबी पुलाचा इतिहास?या पुलाचे उद्घाटन 20 फेब्रुवारी 1879 रोजी मुंबईचे तत्कालिन गव्हर्नर रिचर्ड टेंपल यांच्या हस्ते झाले होते. 1880 मध्ये सुमारे 3.5 लाख खर्चून पूल बांधला होता. त्यावेळी पूल बांधण्याचे साहित्य इंग्लंडमधून आले होते. दरबारगड आणि नजरबागला जोडण्यासाठी हा पूल बांधण्यात आला होता. मोरबीचा हा केबल पूल 140 वर्षांहून जुना असून त्याची लांबी सुमारे 765 फूट आहे. हा केबल ब्रिज केवळ गुजरातच्या मोरबीचाच नाही तर संपूर्ण देशाचा ऐतिहासिक वारसा आहे.